स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बीडहून
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भवरवाडी ही जिल्हा परिषद शाळा मुलांना कॅलिग्राफी, रांगोळी शिकविते. फक्त ३२ विद्यार्थी असणार्या या शाळेतील २ री ते ४ थी पर्यंतचे विद्यार्थी रांगोळी आणि कॅलिग्राफीमध्ये प्रवीण झाले आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
मुख्याध्यापक सुनील काकडे आणि शिक्षक अनिल बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांनी शाळेतील मधल्या सुट्टीत मुलांना मोकळे न सोडता, त्या वेळेचा सदुपयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फक्त पुस्तकी ज्ञान न देता मुलांना ‘स्कील बेस एज्युकेशन’ कसे दिले जाईल याचे ही शाळा उत्तम उदाहरण बनली आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुद्धा खूप छान झाले आहे. ही जादू केली आहे शाळेच्या शिक्षकांनी. त्यांच्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये एक कौशल्य विकसित झाले आहे. याचा फार सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढली आहे. तसेच अक्षरांना वळण देण्यासाठी आणि रेषा व्यवस्थित आखण्यासाठी मुलांना जास्त लक्ष द्यावे लागते, ज्यामुळे त्यांचा अटेन्शन स्पॅन मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.याचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासातही होत असल्याचे शिक्षकांचे आणि पालकांचे म्हणणे आहे.
या रांगोळीच्या साहित्यासाठी येणारा सगळा खर्च शाळाच उचलते आहे. पालकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही. मुलांना जेंव्हा कॅलिग्राफी पेनची आवश्यकता होती तेव्हा गावच्या सरपंचांनी स्वतः कॅलिग्राफी पेन या विद्यार्थ्यांना भेट दिले. यामुळे मुलांचा उत्साह वाढला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर छोट्या शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरू लागले आहे.