स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे दक्षिण पुण्यातून…
मुलांना जीवनसंस्कार देऊन जगण्याच्या पाठशाळेत तयार करणारे अनेकानेक शिक्षक, त्यांच्या सोबतीने अखंड कार्यमग्न असणारे मुख्याध्यापक यांच्या सोबतीने आज ऐश्वर्य कट्ट्यावर अनोखी अशी माणुसपणाची शाळा भरली होती. औचित्य होते शिक्षकदिनाचे आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आले होते एक समाजशिक्षक. अर्थात महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्ते, विचारवंत आणि लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक मा. श्री. संजय आवटे. मुलांना आवश्यक असणारे शिक्षण देत असताना त्यांना माणूस म्हणून घडवा असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थित सर्व शिक्षकांना केले.
तासभर रंगलेल्या त्यांच्या व्याख्यानामध्ये शिक्षकही रमून गेले होते. त्यांनी दिलेल्या जीवनसंदेशाने आजचा शिक्षकदिन खूप वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून चिंतामणी ज्ञानपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील आणि पुणे महापालिकेच्या काही शाळांतील एकूण २८० महिला शिक्षिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मा. श्री. संजय आवटे यांच्या हस्ते सर्व शिक्षिकांना यावेळी मोत्याची माळ, शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आणि त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
कट्टा या संकल्पनेचे कौतुक करून संजय आवटे म्हणाले, आजकाल समाजामध्ये कट्ट्यापेक्षा कट्टी जास्त वाढते आहे. अर्थात अबोला जास्त धरला जातो. परंतु लोकांनी बोलले पाहिजे, भेटले पाहिजे, त्या दृष्टीने ही कट्टा कल्पना उत्तम आहे.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी माणूस झाले पाहिजे ही सध्याच्या काळातील सर्वात अवघड परंतु सर्वात आवश्यक अशी गोष्ट आहे. आपण आपल्या मुलांना शर्यतीतले घोडे बनवतो. पण त्यांना आनंदाने जगायचे कसे हे शिकवायला हवे. हे शिकवण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागणार आहे. सकारात्मकता लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठे काम आहे. मुलांना काय हवं याचा विचारच आपण करीत नाही ही आपली सर्वात मोठी अडचण आहे. आपल्या स्वप्नांची भुतं आपण मुलांच्या खांद्यावर टाकत असू तर ती सर्वात मोठी चूक आहे. मुलगे आणि मुली यांना घडवताना आपली अडचण होते म्हणून त्यांना माणूस म्हणून घडवणे गरजेचे आहे,
आज बदलापूर, कोलकाता येथे महिलांच्या, मुलींच्या संदर्भात ज्या घटना घडताहेत त्या रोखायच्या असतील तर मुलांना आणि मुलींना माणूस म्हणून वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या मुलींना विनेश फोगाट बनायला शिका. मुलींप्रमाणे मुलांनाही माणूस म्हणून जगायला शिकवा. हे काम शिक्षकच करू शकतो. माणसं बदलतात आपण परिवर्तनाची लढाई लढत राहिली पाहिजे. मुलांना जात धर्माच्या पलीकडे घेऊन जा आणि माणूस म्हणून घडवा, असे आवाहन संजय आवटे यांनी केले.
या वेळी लोकमतचे उपसंपादक दीपक होमकर, वरिष्ठ पत्रकार पराग पोतदार, लोकमतचे उपनगर वार्ताहर पांडुरंग मरगजे, सचिन कोळी, धनराज गरड, जयदीप निंबाळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी आप्पा रेणुसे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.