स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे रशियातून
रशिया-युक्रेन युद्धातील प्रचंड संहार आपण सारेच पाहतो आहोत. पण याच युद्धात दोन्ही पाय गमवावा लागलेला एक युक्रेनचा सैनिक मात्र आजच्या घडीला सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याचे एकूण व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर असंख्य तरुणींच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. सध्या तो एका रिअॅलिटी शोमध्येही सहभागी असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढते आहे.
युक्रेनचा सैनिक ऑलेकसांडर बुडको ऑगस्ट 2022 मध्ये ऑलेकसांडर इजियम या शहरात सैनिक म्हणून कार्यरत होता. युक्रेनच्या या शहरावर त्यावेळी रशियाने ताबा मिळवला होता. रशियन सैन्याला पूर्व भागात रसद पुरवण्यासाठी एक केंद्र म्हणून हे रशिया या शहराचा वापर करत होते. या शहरात झालेल्या हल्ल्यातच ऑलेकसांडर जखमी झाला. असह्य वेदनेने विव्हळत असलेल्या ऑलेकसांडरला रुग्णालयात नेण्यात आले, उपचारादरम्यान त्याचे दोन्ही निकामी झालेले पाय काढून टाकण्यात आले.
या घटनेनंतर आता युक्रेनी सेनेचा हा 26 वर्षीय जवान एका रिॲलिटी शोचा स्टार बनलाय. त्यांच्या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या लक्षणीय आहे. ‘द बॅचलर’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. या शो’मध्ये असलेला नायक हा अनेक तरुणींमधून आपला जोडीदार निवडतो, अशी या शो’ची संकल्पना आहे. शोच्या प्रमोशनमध्ये त्याची जी प्रतिमा दिसते आहे तीच अनेकांना भुरळ घालते आहे.
या रिॲलिटी शोच्या माध्यमातून विकलांग लोकांच्या प्रश्नांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
या विषयी तो सांगतो, “लाखो लोक हा कार्यक्रम पाहतात, त्यामुळे विकलांगाप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम एक उत्तम व्यासपीठ आहे.”
ऑलेकसांडर सांगतो, ‘मला जगाला पटवून द्यायचं आहे की युद्धातले जखमी सैनिक किंवा विकलांग लोक हे इतरत्र कुठून आलेले नाहीत तर याच समाजाचा भाग आहेत. ते देखील चांगले जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रगल्भ हवा.’
त्या हल्ल्याची आठवण सांगताना ऑलेकसांडर म्हणतो, “त्या क्षणी मला वाटलं की जणू मी जमीनदोस्त झालो आहे. माझ्या पायांना तीव्र वेदना होत होत्या. त्या क्षणी मला जाणवलं की आता माझे पाय कापावे लागतील. मी वेदनेने विव्हळत होतो जेणेकरून माझा आवाज लोकांपर्यंत जाईल आणि कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल.” त्यांना माहीत होतं की आपल्या इतर सहकाऱ्यांनी आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढून प्रथमोपचार दिले. मात्र, त्यांच्या पायांवरील जखमा या अतिशय गंभीर होत्या. जखमी झाल्याच्या दोन-तीन सेकंदातच मला जाणवू लागले की मी माझे पाय कायमचे गमावले आहेत.”
या दुर्घटनेतून सावरल्यानंतर त्याने ‘इनविक्टस गेम्स’मध्ये पदकदेखील जिंकले असून अमेरिकेतील एका बॅले समूहासह त्यांनी कार्यक्रमही केले आहेत. सध्या युक्रेनमध्ये तो खूप लोकप्रिय आहे आणि जगभरात त्याची ख्याती वाढते आहे.