स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
गुजरातमधील गणेश बरैया हे नाव आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या तीन फूट उंची फक्त २० किलो वजन असतानाही गणेशने ‘डॉक्टर’ होण्याचे आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. चालण्यासंबंधी अपंगत्व असूनही, असंख्य अडथळ्यांवर मात करत त्याने न्यायालयीन लढ्यातून स्वतःचे हक्क मिळवले आणि समाजसेवेचा मार्ग खुला केला. आज हा युवक अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे.
२०१८ मध्ये गणेश बरैयाने MBBS अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. मात्र केवळ उंचीच्या कारणावरून Medical Council of India (MCI) ने त्याचा प्रवेश नाकारला. शारीरिक मर्यादा डॉक्टर म्हणून काम करण्यास अडथळा ठरतील, असा दावा करण्यात आला. पण गणेशने हार मानली नाही. भावनगर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा युवक नीलकंठ विद्यापीठ, तालाजाचा विद्यार्थी होता. आर्थिक अडचणी असूनही त्याने न्यायासाठी संघर्ष सुरू ठेवला. या लढ्यात त्याच्या शाळेचे प्राचार्य डॉ. दलपतभाई कटारिया यांनी संपूर्ण न्यायालयीन खर्च उचलत मोलाची साथ दिली. सुरुवातीला गुजरात हायकोर्टाने MCI चा निर्णय कायम ठेवला. मात्र गणेशने माघार न घेता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
सुप्रीम कोर्टाने अवघ्या चार महिन्यांत ऐतिहासिक निकाल देत स्पष्ट केले की, “उंचीच्या आधारावर कोणालाही वैद्यकीय शिक्षणाचा हक्क नाकारता येणार नाही.” या निर्णयामुळे गणेशच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २०१९ मध्ये गणेशला भावनगर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्याने यशस्वीरित्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तसेच राज्य सरकारने अनिवार्य केलेली इंटर्नशिपही पूर्ण केली. आज तो ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करत आहे.
“ग्रामीण भागात आरोग्यसेवेची सर्वाधिक गरज आहे. गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून मी डॉक्टर झालो,” असे गणेश सांगतो. सुरुवातीला त्याच्या उंचीमुळे काही रुग्ण आश्चर्यचकित होतात, मात्र काही वेळातच ते त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. “लोक मला पाहून थोडे दचकतात, पण नंतर सकारात्मकतेने वागतात आणि समाधानी होतात,” असे हसत सांगणाऱ्या गणेशचा आत्मविश्वास, चिकाटी आणि सेवाभाव आज असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
उंची महत्त्वाची नाही. तुम्ही ज्ञान किती संपादन केले आहे आणि त्याचा समाजासाठी तुम्ही वापर कसा करता हेच शेवटी महत्त्वाचे आहे असे गणेश आवर्जून सांगतो. त्याची जीवनगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.






