स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे फुलंब्री येथून
कठोर परिश्रम आणि चिकाटी या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे फुलंब्री येथील सागर मैंद हा तरुण… त्याने दोन वर्ष मोबाईलचा त्याग करत, अकॅडमीतच सफाईचे काम करून पोलीस भरतीत मोठं यश मिळवलं आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण अत्याधुनिक पद्धतीने अभ्यास करत यशाचे शिखर गाठायचा प्रयत्न करीत असतो. मात्र, घरची परिस्थिती हालाखीची आणि घरात अठराविश्व दारिद्र्य असतानासुद्धा जिद्द आणि चिकाटी ठेऊन उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सागर याने कठोर मेहेनत केली. खाजगी अकॅडमीत सराव करायला पैसे नसल्याने तेथील साफसफाईचे काम करून या तरुणाने छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस भरतीत ‘पोलीस कॉन्स्टेबल’ या पदावर नियुक्ती होऊन यश मिळविले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.
फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील सागर एकनाथ मैंद या तरुणाला पोलीस भरतीची मोठी आवड होती. परंतु पोलीस भरतीचा सराव करताना त्याला असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जगाच्याही पुढे धावावे लागते. तेव्हाच आपला ठाव लागतो. त्यामुळे अपार मेहेनत करायची असे त्याने मनाशी पक्के ठरवले होते.
बाबरा येथील सागर मैंद हा शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याचे आई-वडील व भाऊ शेती, मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याला पोलीस भरती सराव करताना अकॅडमीची गरज भासू लागली. मात्र खाजगी अकॅडमीत भरण्यासाठी पैसे नसल्याने त्याने त्याच अकॅडमीमध्ये साफसफाईचे काम करीत अकॅडमीत प्रवेश केला. अकॅडमीत प्रवेश केल्यानंतर दररोज तो सातत्याने सराव करीत असे.
पोलीस भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असल्याने मोबाईलमुळे मोठा व्यत्यय येतो आहे, असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने त्याच क्षणी मोबाईलचा त्याग केला. तब्बल दोन वर्ष सातत्याने आपल्या ध्येयावर त्याने लक्ष केंद्रित केले. लेखी परीक्षेचा अभ्यास, मैदानी खेळ व शारीरिक कसरत त्याने नियमित सुरू ठेवली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जेल पोलीस भरतीमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या यादीत अकराव्या रँकमध्ये येऊन सागर एकनाथ मैंद हा पोलीसात दाखल झाला.
याविषयी सांगताना सागर मैंद याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. जोपर्यंत भरती होणार नाही तोपर्यंत मोबाईल वापरणारच नाही, असा पवित्रा सागरने घेतला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जेल पोलीस भरतीमध्ये सागर मैंद हा भरती झाल्याचे कळल्यानंतर चार दिवसांनी त्याने सिमकार्ड घेऊन मोबाईल सुरू केला.
याविषयी तो म्हणतो, सरावात सातत्य व एकाग्रता ठेवण्यासाठी मोबाईलपासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. मोबाईलच्या रिल्स आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व सरावात एकाग्रता करता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी एकाग्रतेने सराव केल्यास नक्कीच यश मिळते. सागर सागर मैंदची ही यशस्वी वाटचाल इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.