स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे चंदीगढहून
भारतात केशरची मागणी जास्त प्रमाणात असल्याने, तसेच भारतातील केशरचे उत्पादन वाढल्याने येथील शेतकरी, निर्यातदार आणि आयातदार यांना मोठा नफा मिळत आहे. त्यामुळे या शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल असा विचार करून रमेश गेरा यांनी घरामध्ये केशराची लागवड करण्यास सुरुवात केली. रमेश गेरा यांनी प्रत्यक्षात आपल्या घरातच केशरची शेती करून लाखो रुपये कमावले आहेत.
परदेशातील केशर शेतीने झाले प्रभावित
रमेश गेरा हे हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हरियाणातच पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले.नंतर काही कामानिमित्त त्यांना दक्षिण कोरियाला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांनी शेतीविषयक अनेक प्रगत तंत्रे पहिली आणि हायड्रोपोनिक शेतीचे तंत्र आत्मसात केले. दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात केशरची लागवड केली जाते. हीच केशर शेती पाहून रमेश प्रभावित झाले. हे तंत्रज्ञान भारतात आणावे आणि केशराचे उत्पादन भारतातच व्हावे, अशी इच्छा रमेश त्यांच्या मनात घर करू लागली. त्यानंतर रमेश यांनी केशर शेती करण्याचा निर्णय घेतला आणि गेरा यांनी घरामध्येच केशराची लागवड करण्यास सुरुवात केली.
आजूबाजूच्या परिसरातील माती आणि हवामान यामुळे रमेश गेरा यांना केशर शेती करताना पहिल्या दोन वर्षांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले.परंतु त्यांनी हार न मानता काश्मीरमध्ये जाऊन पुन्हा संशोधन केले. नंतर तेथून माती आणली. व पुन्हा केशरची लागवड केली. त्यासाठी रमेश यांना काश्मीरमधून २ लाख रुपयांचे बियाणे आणावे लागले. आज रमेश १.५ किलो पेक्षा जास्त केशर तयार करत असून त्याची बाजारात विक्री २ ते २.५० लाख रुपये प्रति किलो या दराने होत आहे. त्यामुळे रमेश यांनी आत्तापर्यंत केशर शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
चरक्षी सेफ्रॉन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रमेश यांना केशर शेतीतून यश मिळाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येण्यास सुरुवात झाली. रमेश यांनी ‘चरक्षी सेफ्रॉन इन्स्टिट्यूट’ या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून आत्तापर्यंत १०५ हून अधिक शेतकऱ्यांना घरच्या घरी प्रशिक्षण दिले आहे. त्याचबरोबर ते हरियाणामधील तुरुंगात असणाऱ्या कैद्यांनाही शेतीच्या प्रगत पद्धती शिकवत आहेत. जेणेकरून कैद्यांमध्येही कौशल्य विकसित होऊन भविष्यात त्यांना चांगले जीवन जगता येईल. रमेश यांचे हे आगळे काम नक्कीच स्तुत्य आहे.