राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० ची सांगता
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय क्षितीजावर संशोधनात मोलाची कामगिरी करणारा शास्त्रज्ञ… एक पाय नसतानाही मॉडेलिंग करणारा आणि स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभा राहिलेला प्रेरणादायी युवक…शेताच्या बांधावर जाऊन तेथून कोट्यवधीचा व्यवसाय उभारणारा युवा उद्योजक… आणि कुस्तीच्या मैदानात आंतरराष्ट्रीय क्षितीजावर मर्दुमकी गाजवून देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा खाकी वर्दीतला जिगरबाज… असे एकापेक्षा एक रिअल हिरोज आज भेटीला आले आणि त्यांनी युवकांची मने जिंकली.
निमित्त होते, परिवर्तन संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद ५.० चे! रिअल हिरोज या सत्रामध्ये युवकांशी संवाद साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व सहाय्यक पोलिस उपायुक्त राहुल आवारे, हॅब बायोमास या स्टार्टअपचे संचालक कृणाल जगताप, युवकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व हर्षदकुमार वारघडे हे आवर्जून उपस्थित होते.
“आयुष्यात जेव्हा एखादा जिव्हारी लागणारा अपमान होतो. तोच तुमच्या आयुष्यातील टर्निग पॉईंट ठरतो, त्या अपमानातूनच आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते.” अशी भावना या सर्व उपस्थित रोलमॉडेल्सनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, राहुल मोकाशी, प्रतिक टिपणीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ व्या वंशज वृषालीराजे भोसले, पी एस आय स्वरूपा नायकवडे, रिट संस्थेचे श्रीधर नाळे यांचे विशेष सत्कार करण्यात आले.
साताऱ्यातील मायणी गावातील जिल्हा परिषदेची शाळा ते ऑक्सफर्ड हा प्रवास कसा झाला ते डॉ. नानासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले, “एका जर्मन व्यक्तीने सिव्ही बघून नावे ठेवली. त्याने सांगितलं की जिथे तू शिक्षण घेतलं त्या संस्थांना जगात कुठेच स्थान नाही. म्हणून मग जगातील पहिल्या पाच विद्यापीठांची नावे काढली आणि तिथे शिकायचं ठरवलं. त्या जिद्दीनेच शिष्यवृत्ती घेऊन ऑक्सफर्डमध्ये गेलो. उंचावर जाणं सोपे आहे पण तिथे टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कितीही अपयश आले तरी टिकून राहण्याची क्षमता असणे आवश्यक असते.”
ते म्हणाले, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आईवडिलांची, तुमची परिस्थिती बदलवावीशी वाटेल ती खरी प्रेरणा असते. आजाराचे निदान आपल्या आतच आहे. ती म्हणजे इम्यूनिटी. ती प्रेरणा जगवा म्हणजे तुम्ही कोणत्याही आजारावर, परिस्थितीवर मात करू शकाल.”
राहुल आवारे म्हणाले, ” घरात कुस्तीचे वातावरण असल्याने त्यावर चर्चा होत त्यातून प्रेरणा मिळत गेली. माझे गुरू मला म्हणत तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला वेडे व्हायला हवे. अनेक अपयशानंतर ही जो प्रयत्न करत राहतो तो खरा यशस्वी असतो. यश एका झटक्यात मिळत नाही. टिकून राहणे आवश्यक असते.”
हर्षदकुमार वारघडे म्हणाले, ” वयाच्या सहाव्या वर्षी अपघात झाला. एक पाय पूर्णपणे काढून टाकावा लागला. पण माझा कायम प्रयत्न असतो मी माझं दुःख चेहऱ्यावर येऊ देत नाही. आजुबाजूच सकारात्मक वातावरण बिघडवयचे नाही. जे झालं तेच धरून बसलो तर पुढे कसे जाणार? एखाद्या गोष्टीकडे जसे बघता तसेच दिसते म्हणून दृष्टी बदला जग बदलेल. मी माझ्या कमजोरीला माझी ताकद बनवली. जिद्दीने उभे राहिलो. आमच्या कुटुंबात सगळ्यात चांगला दिसणारा मीच. म्हणून मॉडेलिंगसाठी गेलो. एक गोष्ट जाणवली प्रोत्साहन दिलं तर माणूस क्षमतेपेक्षा जास्त करू शकतो. मी सतत स्वतःला प्रेरणा, प्रोत्साहन देत असतो. आयुष्यात आई वडीलांपेक्षा मोठं मोटिवेशन कोणतंच नाही. तुमच्यातील कौशल्य तुम्ही वाढवले तर जग तुमचे आहे. जो वेळ हातात आहे तो सत्कारणी लावा आणि अधिकाधिक मेहनत करा. प्रत्येक क्षण जगा.”
कृणाल जगताप म्हणाले, “अभियंता बनून किमान २५ हजार रुपये कमवायचे एवढंच माझं स्वप्न होतं. पण पहिलीच नोकरी १२ लाख पॅकेजची आली. मी जॉईन झालो पण ते काम नाही अवडल आणि नोकरी सोडली. गांडूळ खताची आयडिया मिळाली. पैसा फक्त कष्टातून नाही तर आयडियातून मिळतो. वर्मी कंपोस्ट (गांडूळ खत) यात काम केलं आणि परदेशात देऊ लागलो. यातून एक शिकलो स्वतःसोबत प्रामाणिक रहा. आपले नीतिमूल्ये जपत बदलत्या काळाशी जुळवून घ्या, जग तुमचे आहे. ”
सर्वात शेवटी हर्षदकुमार वारघडे यांनी झिंगाट या गाण्यावर केलेले नृत्य सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे करणारे ठरले. एक पाय नसतानासुद्धा त्याने साधलेले संतुलन आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अनेकांसाठी प्रेरणा देणारा ठरला. त्याच प्रेरणादायी वातावरणात युवा परिषदेची सांगता झाली.






धन्यवाद सर 🙏