(पराग पोतदार)
स्वदेस न्यूज :-
आजची महत्त्वाची बातमी आहे पुण्याहून
ढासळत्या परिस्थितीतून वाट काढण्यासाठी पुणेकरांची एकजूट झाली असून वाढती गुन्हेगारी, मुलींवरचे अत्याचार, वाहतूककोंडी, व्यसनाधिनतेचे आव्हान अशा विविध गंभीर सामाजिक प्रश्नांतून वाट काढण्यासाठी आता पुणेकरांनीच एकत्र येऊन मार्ग काढण्याचा निर्धार केला आहे.
सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे आणि समाजातील विविध प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यात उतरून प्रत्यक्ष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते पराग ठाकूर, शिरीष मोहिते आणि उदय जगताप यांनी या प्रयत्नांसाठी कंबर कसली आहे. त्या दिशेने जाण्यासाठीचे पहिले विधायक पाऊलही त्यांनी उचलले आहे.
समाजातील सद्यपरिस्थितीविषयी सज्जनशक्तीला वाटत असलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ‘वेध अस्वस्थ मनाचा‘ या एका आगळ्या वेगळ्या परिसंवादाचे आयोजन दिनांक १५ मार्च रोजी पुण्यात करण्यात आले आहे. आपण अनुभवलेले पुणे-महाराष्ट्र आणि मरणावस्थेत व हरवत चाललेले पुणे-महाराष्ट्र या विषयावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता नीतू मांडके सभागृह, टिळक रोड येथे होणार आहे. यात उपायुक्त संदीपसिंह गील, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक माधव भंडारी, सूर्यकांत पाठक, अंकुश काकडे, गणेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
ढासळलेली राजकीय संस्कृती, वाढत चाललेली गुन्हेगारी, टीआरपीच्या नादात हरवलेली शोध पत्रकारिता, वाढलेले वाचाळवीर, मुलींवर होणारे अत्याचार, वाढलेले व शिस्त नसलेले ट्रॅफिक या विविध गंभीर विषयांवर या परिसंवादात भाष्य केले जाणार आहे. संघटित समाज शक्तीचे दर्शन या पुढील काळात व्हावे आणि काही चांगले पर्याय आपण शासन आणि प्रशासनाला सुचवावे, त्यातून काही विधायक, समाजोपयोगी बदल घडावेत हा उद्देश ठेवून हा पुढाकार पुणेकरांनी घेतला आहे.
हा कार्यक्रम संपूर्णतः बिगर राजकीय स्वरूपाचा आहे. सत्ताधारी अथवा विरोधक या कोणाचेही समर्थन या कार्यक्रमातून होणार नाही. मात्र पुणेकरांच्या अस्वस्थतेला वाचा फोडण्याचा प्रयत्न मात्र अगदी निश्चितपणाने केला जाणार आहे. हा पुढाकार कुणीतरी घेणे आवश्यक होते कारण तेव्हाच काही बदल घडू शकतील अशी आशा निर्माण होणार आहे, असे मत पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.