स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
तुझी नाकाला जीभ पोहचते का? असे अनेकदा कोणी गमतीने म्हटले तरी आपण खरेच जीभ नाकापर्यंत पोहोचते का ते बघतो. पण फार काळ नाकाला जीभ लावून थांबणे तसे कठीणच आहे. परंतु या आजोबांनी चक्क नाकाला जीभ लावून त्याची विश्वविक्रमी नोंद केली आहे.
जीभ हे दुधारी शस्त्र आहे त्यामुळे ते जपून चालवा असे म्हटले जाते. मात्र, याच जिभेने कसबा पेठेतील ७६ वर्षीय आजोबांना जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवले आहे. कसब्यातील शिंपी आळीतील सोपान ऊर्फ काका भूमकर या आजोबांनी तब्बल एक तास ३ मिनिटे ३९ सेकंद नाकाला जीभ लावून रेकॉर्ड केला आहे. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नुकतीच झाली आहे.
भूमकर यांनी काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात एका मुलीने २१ मिनिटे नाकाला जीभ लावल्याची बातमी वाचली. बातमी वाचल्यावर आजोबांनीही आपण हे करू शकतो, असा चंग बांधत पहिल्याच प्रयत्नात ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ जीभ नाकाला टेकवली. आजोबांनी पुन्हा आपण यापेक्षा अधिक वेळ करू शकतो हे तब्बल ९० मिनिटे नाकाला जीभ टेकवून दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमाची आजोबांची नात मिहिका हिने जागतिक विक्रम तपासले असता, गिनीज बुकमध्ये ते ५२ मिनिटांचे असल्याचे समजले. तो विक्रम मोडून आजोबांनी पुन्हा नव्याने केलेल्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली.






