- आपत्कालीन सहकार्यासाठी सुरू झाली ‘मोरया हेल्पलाईन’
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून
आजच्या घडीला जग हेच एक ग्लोबल खेडे झालेले आहे. त्यामुळे लाखो पुणेकर आज नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत. परंतु आपत्कालीन प्रसंगी किंवा संकटाच्या वेळी आपल्या मदतीला कोण धावून येणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असतो. आता मात्र साक्षात विघ्नहर्ताच अशा संकटकाळी मदतीसाठी धावून येणार आहे. कारण ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या निमित्ताने परदेशातील पुणेकरांच्या आपत्कालीन सहकार्यासाठी मोरया हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहरात सामाजिक भान जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचे खूप मोठे जाळे पसरले आहे. त्यांनी एकत्रितपणे हा पुढाकार घेतलेला आहे. पुणे शहरातील विविध गणेश मंडळांचा सहभाग असलेल्या जय गणेश व्यासपीठ च्या माध्यमातून आणि रेडिओ, स्वदेश सेवा फाऊंडेशन ह्यांच्या सहकार्याने परदेशात राहणाऱ्या पुणेकरांसाठी अत्यंत आवश्यक अशा ‘मोरया हेल्पलाईन’ची निर्मिती करण्यात आली आहे.
पुणे शहरातील लाखो नागरिक हे नोकरी, व्यवसाय, शिक्षण ह्या निमित्ताने परदेशात असतात. त्यांचे कुटुंबीय किंवा त्यांना पुण्यात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर हक्काच्या लोकांची गरज असते हीच गरज ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून गणेश मंडळांचे कार्यकर्ते पूर्ण करणार आहेत, अशी माहिती अशी माहिती जय गणेश व्यासपीठचे उदय जगताप, शिरीष मोहिते, पियुष शहा, ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक वैभव वाघ आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या धनश्री पाटील ह्यांनी दिली.
७७७०००३४१६ ह्या क्रमांकावर तसेच www.globalganeshfestival.com ह्या वेबसाईट वर ही हेल्पलाईन २४ तास सुरु असणार आहे
महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव हा आता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता ग्लोबल झाला आहे. शेकडो देशांमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. त्याच बरोबर मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक उत्साहाने महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात सहभागी होतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा पुणे शहराच्या गणेशोत्सवातील सहभाग अधिक वाढवून पुण्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनविणे त्याच बरोबर संपूर्ण जगातील गणेशोत्सवाचे आयोजक एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने ग्लोबल गणेश फेस्टिव्हल ह्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
या उपक्रमांतर्गत पुणेकरांच्या आपत्कालीन सहकार्यासाठी “मोरया हेल्पलाईन चा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वैभव वाघ ९८९०७९८९०३ यांच्याशी संपर्क साधावा.