साकारले महाराष्ट्रातील पहिले ढोल-ताशा पथक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
गणेशोत्सवात सर्वाधिक आकर्षण असते ते ढोल-ताशा पथकांचे. असेच आकर्षक तृतीयपंथी मनस्वी गोइलकर यांना देखील झाले. या आकर्षणातूनच ढोल ताशा पथकात सहभागी होण्याची इच्छा त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी काही पथकांकडे त्याबाबत विचारणा केली. मात्र समाजात जसा बहुतांश ठिकाणी तृतीयपंथीयांना नकार ऐकायला मिळतो, त्याचप्रमाणे इथेही त्यांना नकार मिळाला. पण याच नकारातून त्यांनी प्रेरणा घेत ‘शिखंडी’ या महाराष्ट्रातील पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक साकारले. त्यांनी तृतीयपंथीयांचे स्वतंत्र पथक सुरू केले असून यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचे वादन पाहायला मिळणार आहे.
यासाठी मनस्वी गोइलकर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ढोल-ताशा कसे जमवायचे, सराव कोठे करायचा, प्रशिक्षण कोण देणार आदी अडचणी त्यांच्यासमोर होत्या. त्यावर मात करत ‘शिखंडी’ ढोल-ताशा पथकाचा ४ ऑगस्टपासून मार्केट यार्ड परिसरात सराव सुरू झाला. या पथकाने नांदेड येथे झालेल्या राज्य सरकारच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये १६ ऑगस्टला त्यांचे पहिले वादन केले. तृतीयपंथी व्यक्तीही सक्षमपणे आपल्या बरोबरीने उभे राहू शकतात, हा संदेश ‘शिखंडी’ पथकाने समाजाला दिला. या पथकात शहराच्या वेगवेगळ्या भागांतील सध्या एकूण ३० तृतीयपंथी व्यक्ती आहेत. रोज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या पथकाचा सराव चालतो.
याविषयी मनस्वी गोईलकर म्हणाल्या, ‘माझ्या गुरू कादंबरी शेख यांनी तृतीयपंथी व्यक्तींचे एक स्वतंत्र पथक सुरू करायचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही कामाला सुरुवात केली. मात्र कोणालाही वादनाचा अनुभव नव्हता. मग काय करायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. परंतु इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाच्या जोरावर मार्ग काढला. नादब्रह्म ढोल-ताशा पथकाचे अतुल बेहरे यांनी आम्हाला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली तर प्रीतेश कांबळे आणि प्रवीण सोनावणे यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली. कादंबरी शेख यांनी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केला.’
कादंबरी शेख म्हणाल्या, ‘शिखंडी’ हे पथक सुरू करताना अनेक अडचणी आल्या. मात्र इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाच्या जोरावर मार्ग काढत हे पथक सुरू केले.
सकारात्मक पाऊल