भारतीय बंधुत्वाचे अनोखे उदाहरण
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची आनंद देऊन जाणारी बातमी आहे काश्मीरमधून…
देशाची विविधता आणि विविधतेतील एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. सदैव बंधुभाव जपणाऱ्या या देशात असेच एक अनोखे उदाहरण समोर आले आहे. पुण्याचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ मूर्तीची प्रतिष्ठापना थेट काश्मीरमधील एका मंदिरात करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाला ही सकारात्मक बातमी नक्कीच आपल्याला आनंद देऊन जाईल.
पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची काश्मिरातील मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
‘सर्वधर्म समभाव’ हा संदेश देत वंदे मातरम संघटना युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट आणि सरस संस्था यांच्या पुढाकाराने ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही प्राणप्रतिष्ठा श्रीनगर लाल चौक काश्मीर येथील गणेश सेवा मंडळाच्या पंचमुखी हनुमान मारुती मंदिरात करण्यात आली आहे.
30 किलो वजन असलेली व्हाइट मेटलची ही मूर्ती कायमस्वरूपी मंदिरात विराजमान होणार आहे. ही मूर्ती गणेश मुंदडा यांच्याकडून बनवून घेतली आहे. ही मूर्ती काश्मीरला रवाना झाली असून आज सकाळी त्याची ‘प्राणप्रतिष्ठा’ करण्यात आली.
यावेळी वंदे मातरम संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, विशाल शिंदे, धनाजी हासबे, अनुप सावंत, चंद्रकांत जाधव इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सचिन जामगे म्हणाले, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून ही मूर्ती हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतीक तर आहेच. परंतु जात ,धर्म, प्रांत फक्त भारतीय असणाऱ्या आम्हांसर्वांची ही मूर्ती एकात्मतेची प्रतीक देखील आहे.
जवानांसाठी दिवाळी फराळ
या उपक्रमाबरोबर वंदे मातरमने जवानांसाठी देखील दिवाळी फराळाचे आयोजन केले. श्रीनगर येथील जवानांनी यात सहभाग घेत महाराष्ट्रीयन दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. यात 20 ते 25 जवानांनी सहभाग घेतला. उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे.
जय गणेश, सुंदर कार्य, उत्तम शब्दांकन