* वर्दीतल्या माणुसकीचे उत्कट दर्शन
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे चंद्रपूरहून
पद, प्रतिष्ठा किंवा इतर काही ही आपली ओळख नसते. खरी ओळख असते माणुसकी. चंद्रपूरमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला वाहतूक पोलिसांनी 15 दिवसाच्या चिमुरडीचा जीव वाचविला आहे.
त्यामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पल्लवी सदनवार असे या महिला पोलिसाचे नाव आहे. पल्लवी सदनवार या चंद्रपूर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे त्या कामावर होत्या. पंधरा दिवसाच्या मुलीला रक्ताची गरज असल्याचे त्यांना समजले. या मुलीला कावीळ झाली होती. अशा स्थितीत तातडीने रक्त देणे आवश्यक होते. याची माहिती मिळताच पल्लवी यांनी सामाजिक बांधीलकीचे भान राखत त्या मुलीसाठी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रक्तदान केले. या रक्तदानामुळे त्या 15 दिवसाच्या चिमुकलीचा जीव वाचला. त्यांनी केलेल्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांनी पल्लवी यांचे आभार मानले. पोलिस विभागानेही याची दखल घेत पल्लवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
रक्तदान केल्यानंतर पल्लवी या आपल्या कर्तव्यावर लगेच रुजू झाल्या. सदनवार यांचे हे कार्य प्रेरणादायी ठरले असून, अशा पोलीस कर्मचार्यांमुळेच समाजात माणुसकीचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते असं म्हटले तर वावगे ठरणार नाही.