स्वदेश न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे तमिळनाडूतून
स्वयंपाकाची असणारी आवड जोपासत सुरू केलेल्या छोट्याशा व्यवसायात आज चांगली प्रगती करीत १०० कोटींची उलाढाल करणाऱ्या व्यवसायापर्यंत मजल मारण्याचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. ही कहाणी आहे तमिळनाडूतील एका स्त्रीची. जिने आयुष्यातील अनेक संघर्षांना तोंड देत स्वतःला पायावर उभे केले आणि अवघ्या ५० पैशांच्या काॅफीविक्रीतून सुरुवात करून यशाचे शिखर गाठले. त्या महिलेचे नाव आहे पॅट्रिशिया नारायण.
सध्या सर्वच क्षेत्रांत महिलांचे सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळत आहे. नृत्य असो, गायन असो, क्रीडा असो किंवा अगदी व्यवसाय असो अशा विविध क्षेत्रांत महिला आपले, आपल्या देशाचे आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव अभिमानाने उंचावत आहेत. सध्या उद्योजक पुरुषांइतक्याच महिलाही मेहनतीच्या जोरावर उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस सर्वाधिक उंची गाठत आहेत.
तामिळनाडूतील नागरकोइल येथे ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या पॅट्रिशिया यांचे वयाच्या १७ व्या वर्षी नारायण नावाच्या मुलाशी मनाविरुद्ध लग्न लावून देण्यात आले. पण, लग्नानंतर त्यांना कळाले की, त्यांचा पती अमली पदार्थांचे सेवन करणारा आहे. शिवाय तो त्यांना मारहाणही करायचा, त्यामुळे लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांसह घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या त्यांच्या माहेरी परतल्या आणि हळूहळू आपली ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेऊ लागल्या.
पॅट्रिशिया यांना स्वयंपाक करण्यात मोठा रस होता, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आईकडून आर्थिक कर्ज घेऊन घरीच लोणचे आणि जाम बनवून विकायला सुरुवात केली. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, पॅट्रिशिया यांनी नंतर चेन्नईमधील जास्त वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणांपैकी एक असलेल्या मरीना बीचजवळ एक कार्ट सुरू केली. त्यांनी सुरुवातीच्या दिवसांत एक कप कॉफी ५० पैशांना विकली. त्यानंतर त्यांनी त्यांचा हा छोटा व्यवसाय वाढवला. त्यांनी दोन अपंग कामगारांना स्नॅक्स, ताज्या फळांचा रस, कॉफी आणि चहा विकण्यासाठी कामावर ठेवले. हळूहळू त्यांची दिवसभराची विक्री ७०० रुपयांपर्यंत पोहोचली.
१९८२ ते २००३ पर्यंत त्यांनी त्यांच्या या व्यवसायावर बऱ्यापैकी पैसे कमावले. त्यानंतर काही दिवसांनी झोपडपट्टी क्लिअरिंग बोर्डाचे अध्यक्ष त्यांच्या हाताच्या चवीने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात कॅन्टीन सुरू करण्याची ऑफर दिली. त्यानंतर त्यांनी चेन्नईतील प्रत्येक कार्यालयात नवीन शाखा उघडल्या. २००४ मध्ये पॅट्रिशिया यांना मोठा धक्का बसला. एका अपघातात त्यांची मुलगी आणि जावयाला जीव गमवावा लागला होता. मुलीच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या पॅट्रिशिया यांनी एक रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला २००६ मध्ये पॅट्रिशिया यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर संदीपा हे रेस्टॉरंट सुरू केले. त्यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. काही वर्षांनी संदीपा नावाच्या अनेक रेस्टॉरंट फ्रँचायजींची स्थापना झाली. पॅट्रिशिया यांच्या रेस्टॉरंटमध्ये २०० हून अधिक कर्मचारी काम करतात. या व्यवसायात दररोज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होत आहे आणि त्यामुळे पॅट्रिशिया नारायण यांची एकूण संपत्ती १०० कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे.