३५ वर्षांपासून अव्याहतपणे कार्य सुरू
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे कोलकत्ताहून
काही माणसांच्या आयुष्यातील एखादी घटना माणसांचे जीवन जगण्याची पद्धत आणि त्यांची विचार करण्याची दिशाच बदलून टाकते. बंगालच्या लक्ष्मी दा यांच्याही बाबतीत असेच काहीसे घडल़े ज्याने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. त्याचा परिणाम आज लक्ष्मी दा कलकत्यातील रामराजतल येथील हावडा ब्रिजच्या खाली रेल्वे पटरी ओलांडणार्या प्रवाशांचे जीव वाचवित आहेत. नारळ विकणारे लक्ष्मी दा गेली ३५ वर्षे ही सेवा अखंडपणे देत आहेत.
१९९१ साली एके दिवशी नारळ विकत असताना त्यांनी रेल्वे पटरी ओलांडणारे २१ प्रवासी लोकल रेल्वेखाली आल्याचे पाहिले. त्यात त्या प्रवाशांचा जीव नाहक जीव गेला. त्यांच्या किंकाळ्यानी आणि तेथील प्रत्यक्ष पाहिलेल्या दृश्यांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवले की माझ्या भागात मी असेपर्यंत पटरी ओलांडणार्या एकाही रेल्वे प्रवाशाचा जीव जाणार नाही आणि तिथूनच त्यांच्या या सेवेला सुरुवात झाली
स्टेशनला ओवर ब्रिज असला तरी प्रवाशी घाईतच पटरीवरून रस्ता पार करताना दिसतात. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे सगळं थांबविण्यासाठी ते आपला दिनक्रम सकाळी पाच वाजता सुरू करतात. ते सकाळी नारळ विकायला तिथे जातात आणि रेल्वेची वेळ झाली की हातात काठी घेऊन ते आपल्या कार्याची सुरुवात करतात. प्रत्येक येणार्या जाणार्या प्रवाशांना ते सुरक्षितपणे पटरी पार करून देतात. त्यांना प्रत्येक रेल्वेची तेथून जाण्याची वेळ लक्षात असते, यानुसार ते आपल्या कार्याचे नियोजन करतात.
नारळ वेचणार्या या सभ्य गृहस्थाला या कामासाठी ना पगार मिळतो ना आजवर कुठला पुरस्कार प्राप्त झाला आहे, पण त्यांची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. लक्ष्मी दा यांच्यासारखी निस्वार्थी काम करणारी मंडळी आपल्याला जगण्याचे बळ तर देतेच पण स्वतःचे काम चोख बजावण्यासाठी आयुष्यात नवी ऊर्जा देखील प्राप्त करून देते.






