परिवर्तनचा १३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
अवास्तव अपेक्षा आणि आशा आकांक्षांचे मनावरचे ओझे हे ताणतणावाचे मूळ कारण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात म्हणून आपण स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःसोबत रमणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने आपल्याला निश्चितपणे मनःशांती प्राप्त होऊ शकते आणि ताणतणावांचे व्यवस्थापन सुलभ होऊ शकते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोगगुरु डाॅ. संप्रसाद विनोद यांनी केले
परिवर्तन या सामाजिक संस्थेचा १३ वा वर्धापन दिन नांदेड सिटी येथे उत्साहात साजरा झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. संप्रसाद विनोद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर परिवर्तनचे गुलाबराव देडगे, जयश्री उमेश चौधरी आणि शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार उपस्थित होते. नांदेड सिटी परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिवर्तन संस्थेच्या १३ वर्षांतील सातत्यपूर्ण व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कामाचा गौरव डाॅ. संप्रसाद विनोद यांनी केला. उत्पत्ती, स्थिती आणि बदल हे वास्तव समजून घेत परिवर्तन हे साजेसे नाव धारण करून हे चांगले काम केले जात असल्याची कौतुकाची थापही त्यांनी दिली.
डाॅ. संप्रसाद विनोद म्हणाले, आपण कोणत्याही बदलाला सहजासहजी तयार नसतो. पण ती अपरिहार्य अशी बाब असते. या बदलांशी जुळवून घेत, त्याचा स्वीकार करून जी माणसं पुढे जातात ती आयुष्याचा आनंद घेतात. मात्र जे बदल स्वीकारत नाहीत त्यांना त्यातून ताण निर्माण होतो. त्यामुळे या गोष्टी समजून घेत आपण जीवनात पुढे गेलो तर ताणतणावांचे व्यवस्थापन सोपे होते. त्यासाठी आत्मयोगसाधना आपल्या जीवनात अवतरली तर जीवन शांत आणि समाधानी होते. मनाला शांत करता येत नाही. त्याला शांत होऊ द्यावं लागलं हे सत्य एकदा का समजलं की मनःशांती मिळवण्याचा आटापिटा कमी होतो. ध्यानधारणेने मनाची शांत लवकर प्राप्त होते म्हणून ध्यानाची गोडी अनुभवणे आणि तो आपला स्वभाव होणे आवश्यक आहे.
या प्रसंगी डाॅ. संप्रसाद विनोद यांनी उपस्थितांना ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला. तसेच त्यांनी लिहिलेली योग आणि ध्यानावरची पुस्तके परिवर्तन संस्थेला भेट दिली. त्यांच्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केले. परिवर्तनच्या कार्याचा आढावा अक्षय उंद्रे यांनी घेतला. गुलाबराव देडगे यांनी आभार मानले.
आदरणीय बाबांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
बाबांच्या भेटीची अनुभूती अवर्णनीय होती