- अवनी लेखराने जिंकले सुवर्णपदक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पॅरिसमधून…
भारताने आता पॅरिस येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. एकाच दिवशी तीन पदके कमावली आहेत. भारताच्या अवनी लेखराने उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे आणि एक नवा इतिहास घडवला आहे.
आजच्या दिवशी भारताने पदकांची सुरुवात केली ती सुवर्णपदकापासूनच. नेमबाजीच्या १० मीटर रायफल गटात भारताच्या अवनी लेखराने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी जपानमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा प्रकारात तिने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे भारतासाठी तिने यावेळी दुसरे सुवर्णपदक मिळविले. त्यामुळे भारतासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनीने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिच्याकडून यावेळी पदकाची अपेक्षा नक्कीच होती. पण अवनी सुवर्णपदक पटकावणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना लागलेली होती. त्यामुळे अवनी यावेळी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. अवनीने २४९.७ एवढे गुण १० मी. एअर रायफल प्रकारात मिळवले आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. यावेळी अवनीच्या आसपासही कोणता स्पर्धक नव्हता. त्यामुळे अवनी पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकेल, असे सर्वांना वाटले होते. अवनीने ही आघाडी कायम ठेवली आणि भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले.
भारताने नेमबाजीतच अवनीबरोबर अजून एक पदक मिळवले. भारताला हे पदक मोना अगरवालने मिळवून दिले. मोनाने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आणि भारताला कांस्यपदक मिळवून दिले. १० मी. एअर रायफल प्रकारात पुरुष गटामध्ये एम. नरवाल याने दुसऱ्या क्रमांकावर येत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ प्रीती पाल हिने भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. प्रीतीने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक कमावले आहे.
प्रीतीने यावेळी आपल्याच रेकॉर्ड यावेळी मोडला. प्रीतीने १०० मीटरचे अंतर १४.२१ सेकंदांत पूर्ण केले आणि भारताला कांस्यपदक जिंकवून दिले. प्रीती पालने यावेळी शर्यतीत दमदार कामगिरी केली. प्रीती पालने सुरुवातीपासून चांगला जोर लावला होता. त्यामुळे प्रीती यावेळी पदक मिळवेल, अशी आशा निर्माण झाली होती. त्यामुळे प्रीतीची ही शर्यत पाहताना तिच्यावर सर्वांचे लक्ष लागलेले होते. यापूर्वी प्रीतीला एवढी जलद कामगिरी कधीच करता आली नव्हती. पण यावेळी मात्र प्रितीने नेत्रदीपक कामगिरी केली. प्रीतीने यापूर्वी रचलेला आपलाच विक्रम मोडीत काढला आणि सर्वोत्तम कामगिरी करत अखेर कांस्यपदक पटकावले. भारताचे हे या पॅरालिम्पिकमधील अॅथलेटीक्समधील पहिलेच पदक आहे. यापूर्वी भारताने नेमबाजीत दोन पदकं पटकावली होती.
पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली आहे. जागतिक क्रमवारीत भारत सध्या १३ व्या क्रमांकावर आहे.