स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी नवी दिल्लीहून
जम्मूचे दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसैन यांचा प्रेरणादायी संघर्ष पाहून अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मदतीचा हात दिला आहे. अदानी फाऊंडेशन 34 वर्षीय दिव्यांग क्रिकेटर आमिर हुसैन यांना लवकरच संपर्क करणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे.
बिजबेहारा येथील वाघमा गावातील आमिर हुसैन सध्या जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत. हुसैन 8 वर्षांचे असताना अपघातामुळे त्यांचे दोन्ही हात कापावे लागले होते. क्रिकेटच्या बॅट बनवण्याच्या मशीनला त्यांचा हात लागून हा अपघात झाला होता. सुमारे तीन वर्षे ते रुग्णालयात दाखल होते. वडील बशीर अहमद बॅट बनवण्याच्या कारखान्यात काम करायचे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी सर्व काही विकले. हुसैन पाच भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना तीन भाऊ आणि एक लहान बहीण आहे.
क्रिकेटचे स्वप्न सोडले नाही-
बालपणी अपघातानंतरही आमिर हुसैन यांनी आपले स्वप्न सोडले नाही. हात गमावल्यानंतर त्यांनी बॅट पकडण्याची वेगळी शैली अवलंबली. हुसेन बॅटला खांदा आणि मानेमध्ये अडकवितात आणि नंतर शॉट खेळतात. ते त्यांच्या बोटांच्या दरम्यान चेंडू धरून फिरकी गोलंदाजीदेखील करतात. ते सतत सराव करत राहिले आणि एक दिवस त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
2013 मध्ये मिळाला ब्रेक
हुसैन यांचे टॅलेंट पाहून 2013 मध्ये जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघात त्यांचा समावेश करण्यात आला. लवकरच ते या संघाचे कर्णधारही बनले. 2014 मध्ये आलेल्या पुरामुळे ते जवळपास वर्षभर खेळापासून दूर राहिले. 2015 मध्ये त्यांनी आंतरराज्य पॅरा टूर्नामेंटमध्ये पुनरागमन करत संघाला चॅम्पियन बनवले.