पापरीतील शेतकर्याची अनोखी शक्कल
मोहोळ : बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे फळांवर, विविध पिकांवर रोगाचा प्रार्दुभाव होत आहे. पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करतात, त्यामुळे मोठा आर्थिक भार शेतकर्यांवर पडतो. त्यामुळेच यावर मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील एका शेतकर्याने अनोखी शक्कल लढवली आहे. डाळिंब पिकावर पडलेल्या तेल्या रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि फळांच्या संरक्षणासाठी त्याने आपली फळेच चक्क क्वारंटाईन केली आहेत. आपल्या ६ एकर क्षेत्र डाळींब बागेतील तब्बल २ लाख ४० हजार डाळींब फळांना रद्दी पेपरमध्ये क्वारंटाईन केले आहे. यासाठी सुमारे १ लाख दहा हजार रुपये खर्च आल्याचे डाळींब उत्पादक शेतकर्याकडून सांगण्यात आले..
पापरी परिसरातील शेतकर्यांची सध्या डाळींब बागा बहरल्या आहे शेतकरी पद्माकर भोसले यांनी आपल्या बागेतील डाळींबांची फळे इंग्लिश रद्दी पेपरने कव्हर केली आहेत. या फळांवर तेलकट डाग पडून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कांही शेतकरी तेल्या रोगग्रस्त डाळींबफळे तोडून टाकू लागले आहेत. तेल्या रोगामुळे फवरणींची संख्या वाढू लागली असल्याने त्यांचे आर्थिक बजेट ढासळू लागले असल्याचे दिसते. एक फवारणी करावयाची म्हंटल्यास ५ हजार रुपयांचा खर्च येतो आहे. सध्या सकाळी ऊन,दुपारी पाऊस,संध्याकाळी ढगाळ असा वातावरणात बदल होत असल्याने तेल्या रोगास पोषक वातावरण आहे.तेल्या संसर्गजन्य रोग असल्याने तो बागेत झपाट्याने वाढत असतो.

यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पापरी येथील पद्माकर भोसले या डाळींब उत्पादकाने आपल्या सहा एकर बागेच्या अडीच हजार झाडांवरील २ लाख ४० हजार डाळींब फळांना इंग्लिश रद्दी पेपर चे आवरण घालत ते फळ क्वारंटाईन करत त्यांचे तेल्या पासून बचाव करण्याचा प्रयोग केला आहे.
या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता भोसले म्हणाले, सहा एकर बागेतील ५० झाडांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला,तेल्या हा संसर्गजन्य रोग आहे, प्रादुर्भाव झालेल्या झाडांपासून इतर फळांचे संरक्षण व्हावे ती बाधित होऊ नये म्हणून त्यास मी इंग्लिश पेपर रद्दीचे आवरण घालत प्रोटेक्शन केले आहे. रद्दी पेपरचा तेल्या संरक्षणासाठी वापर केल्यामुळे आता संसर्ग होण्यास अटकाव होऊ लागला असल्याचे जाणवू लागल्याचे भोसले यांनी सांगितले.
डाळींब संशोधन केंद्राने या परिसरात तेल्या रोगासंदर्भात एखादे चर्चासत्र आयोजित करून मार्गदर्शन करावे अशी मागणी डाळींब उत्पादकांमधून होत आहे.
रद्दी पेपर प्रयोग बाबत डाळींब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सध्याच्या वातावरणात डाळिंब पिकावर तेलकट डाग, डांबर्या, फळकुज आणि खरडा या सारखे रोग दिसून येत आहे. या रोगांच्या निवारणासाठी व नियंत्रणासाठी संशोधन केंद्राने शेतकरी सल्ले तयार केले आहेत.शेतकरी सदर सल्ले केंद्राच्या वेबसाइट वरून मराठी मध्ये डाउनलोड करू शकतात,किंवा प्रत्यक्ष केंद्रास भेट देऊ शकतात. रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ढगाळ वातावरण असताना किंवा पाऊस पडल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि सूर्य प्रकाश असल्यास आंतरप्रवाहि किंवा स्पर्शजन्य + आंतरप्रवाहि असा वापर करावा. फळाचे संरक्षण करण्यासाठी इंग्लिश पेपर चा वापर करत असल्यास फळांचे वेळोवेळी निरीक्षण करा; जर औषधांची फवारणी नीट सर्व फळांपर्यंत पोहचली नाही तर फळकुज आणि मिली बग चा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.
असे केले संरक्षण
डाळिंब फळांना संरक्षण देण्यासाठी ५०० किलो रद्दी लागली. मराठी रद्दी पेक्षा इंग्लिश पेपर रद्दी चिवट असून ती लवकर भिजत, फाटत नाही, फवारणी स्प्रे करतानाही अडचण येत नाही. परत उन्हात वाळते म्हणून त्याचा वापर केला. फळांना स्टेपलर च्या साहाय्याने ते बसविण्यात आले. रद्दी बसविण्यासाठी धोंडेवाडी ता पंढरपूर येथील मजुरांना १९० रुपये प्रतिकिलो दराने काम दिले असून याकामी ते मजूर तरबेज आहेत.





