- सम्राट फडणीस, प्रसाद पानसे, रसिका कुलकर्णी आदींना देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान
- पत्रकारितेच्या क्षेत्रातील जाणकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
समाजाला दिशा देऊ शकणाऱ्या चांगल्या पत्रकारितेची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, त्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीने चांगल्या पत्रकारितेचे ध्येय ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी व्यक्त केले.
विश्व संवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने दिला जाणाऱ्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांचे वितरण आज फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत उपस्थित होते. सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांच्यासह महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ बातमीदार प्रसाद पानसे, कोल्हापूरच्या आरजे रसिका कुलकर्णी, मराठी कीडा या यू ट्यूबचे चॅनलचे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना नारद पुरस्काराने गौरवण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आंबेकर म्हणाले, राजकारणाच्या क्षेत्रात, प्रशासनाच्या क्षेत्रात जशी सुधारणा आवश्यक आहे तसे पत्रकारिता हे क्षेत्रदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्या क्षेत्रातदेखील काळानुरूप काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. लोकहित केंद्रस्थानी ठेवून पत्रकारिता करणे हे पत्रकारांचे ध्येय असले पाहिजे. आजच्या घडीला भारत देश एक महत्त्वाचे राष्ट्र म्हणून जगात पुढे येत आहे. परंतु अनेकदा माध्यमांकडून बऱ्याच गोष्टी एकतर्फी मांडल्या जातात. नव्या पिढीला हे समजले पाहिजे आणि त्यांनी आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. अनेक गोष्टींची नव्याने पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे. डोळे बंद करून नव्या पिढीने काहीच स्वीकारू नये. नव्या निकोप दृष्टीने सारे काही पाहणे गरजेचे आहे. अनुकरणापेक्षा आपल्यातील सर्वोत्तम जगासमोर कसे येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे.
शिल्पा निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आनंद काटीकर यांनी आभार मानले.