सातासमुद्रापार गेला नाचणीचा खमंग स्वाद
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे कुसुंबीहून
जावली तालुक्यातील काळेश्वरीदेवीचे ओळख असलेले कुसुंबी हे गाव ‘नाचणीचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले आहे. आरोग्यदायी बहुगुणी नाचणीची कुसुंबीकरांनी यंदा विक्रमी लागवड केली आहे. तसेच, येथील महिलांनी तयार केलेले नाचणीचे खमंग पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. त्यामुळे महिलांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध झाले आहे.
कुसुंबी गाव जावली तालुक्यात दक्षिणेस डोंगराच्या पायथ्याला आहे. गावातील कुसुंबी मुरा, चिकणवाडी या डोंगरावरील वस्त्यांमध्ये अतिपावसाच्या प्रदेशात नाचणीची लागवड केली जाते. निसर्गाची उधळण असणार्या या गावात डोंगरावर बेसाल्टचा खडक आणि त्यातून वाहून येणार्या पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक असे खनिजांचे पोषक घटक पिकांना दर्जेदार बनवतात. त्यातच हे पीक घेण्याची पद्धत पारंपरिक आहे. गुरे, शेळ्या, मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे मातीचा पोत देखील चांगला आहे. त्यामुळे येथे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. शेती उतारावर असल्याने पाणी निचरा उत्तम प्रकारे होतो. यामुळे नाचणी पिकाचे उच्च प्रतीने पोषण होते. हलक्या प्रतीच्या व पाण्याचा निचरा होणार्या जमिनीत नाचणी पीक चांगले येते.
नाचणीच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर्षी जावली तालुक्यात ४१० हेक्टर क्षेत्रापैकी १२९ हेक्टर क्षेत्रावरच नाचणीची लागवड झाली आहे. भविष्यात हे पीक राहील की नाही असा प्रश्न असताना, कुसुंबीकरांनी मात्र यंदा नाचणीची विक्रमी लागवड केली आहे.
यातून शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ‘नाचणीचे गाव’ म्हणून बहुमताने ठराव पारित केला. यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशन व वॉर्ड संस्थेच्या सहकार्याने मिळाली. तसेच, भविष्यात पाचवड ते खेड रत्नागिरी अशा मोठ्या होणार्या रस्त्यामुळे येणार्या तीन वर्षात कुसुंबीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होवून इथल्या तरुणांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. आज कुसुंबीमध्ये महिला फार्मर प्रोड्युसर नावाने कंपनी सुरू असून, या माध्यमातून नाचणीवर प्रक्रिया केलेले अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यांची बाजारपेठेत विक्री केली जाते.
——————————————————-
बचत गट निर्मिती, नाचणी प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण शिबिरे, नाचणीच्या पदार्थांची रेसिपी सराव असे उपक्रम घेऊन आहारात पोषक म्हणून नाचणी सुप्रसिद्ध झाल्याने पदार्थांना मागणी वाढली आहे. पदार्थ निर्मितीसाठी गुजरात, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत. कृषी विभागाची साथ व मार्गदर्शन तसेच ग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शाश्वत बाजारपेठेचा उपलब्ध झालेला आधार या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचे सुरक्षित साधन उपलब्ध झाले आहे.
संगीता वेंदे, अध्यक्षा, महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी
गावात पूर्वी तीस ते पस्तीस टन नाचणी उत्पादन होत होते. जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण गाव योजनेत नावणीचे गाव म्हणून कुसुंबीची निवड झाल्यानंतर कुसुंबीत नाचणीचे उत्पादन दुप्पट झाले. यावर्षी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे.
मारुती चिकणे, सरपंच, कुसुंबी