स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
अवयवदानाची समाजातील गरज लक्षात घेऊन पुण्यातील शेकडो मुस्लिम बांधवांनी मृत्यूपश्चात अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. उद्या दिनांक १ सप्टेंबर रोजी ४०० हून अधिक मुस्लिम बांधव अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
भारतातील अवयवदानाची स्थिती अतिशय बिकट आहे. त्याविषयी अद्यापही पुरेशी जागरुकता झालेली नाही. आजच्या घडीला दहा लाखांमध्ये फक्त एकच व्यक्ती अवयवदान करते आहे. त्यामुळे अनेक गरजूंना अवयवदानाची प्रतीक्षा करावी लागते. या प्रतीक्षेत अनेकांचा मृत्यूही होतो. हे सामाजिक वास्तव लक्षात घेऊन सामाजिक जबाबदारीचे भान राखून मुस्लिम समाजाने त्यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे.
वर्क’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तब्बल ४०० हून अधिक जण मृत्यूपश्चात अवयवदानाचा संकल्प उद्या १ सप्टेंबर रोजी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबींची पूर्तताही यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कॅम्पमधील आझम कॅम्पसच्या असेम्बली हॉलमध्ये होणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अवयवदानाचा संकल्प करणाऱ्यांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण लक्षणीय आहे. वर्क संस्थेने अवयव दानाबाबत मुस्लिम समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा आणि त्याविषयी जनजागृतीचे मोठे कार्य हाती घेतले आहे.
या अवयवदानाच्या चळवळीतून अवयवाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण व अवयव दाते यांच्यातील दरी कमी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गात अवयवदानाबाबत असलेले अज्ञान, अनास्था आणि गैरसमज दूर करून मानवी जीवनाला एक नवसंजीवनी देण्याचा संस्थेचा दृढ संकल्प आहे. वर्कच्या या कार्यक्रमातच समाज आणि मानवतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ३६ हून अधिक स्वयंसेवी संस्थांचा सम्मानही करण्यात येणार आहे.
वर्क आॅर्गनायझेशन आॅफ रिलिजन्स अँड नाॅलेज (WORK) ही स्वयंसेवी संस्था 1988 मध्ये स्थापन झाली. स्थापनेपासूनच ही संस्था करुणा आणि सेवेचा दीपस्तंभ ठरली आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे वर्क अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रम राबवत असते. संस्थेचे आजवरचे सर्वच उपक्रम धर्म आणि जात यांच्यापलीकडे जाणारे आणि मानवतेचा उद्घोष करणारे राहिले आहेत.
वर्कचे हे समाजोपयोगी उपक्रम तब्बल आठ देशांमध्ये राबवले जातात. भारतातील सुमारे २०० हून अधिक जिल्ह्यांमधून वर्कचे उपक्रम राबवले जातात. वर्क ही स्वयंसेवी संस्था उद्या (१ सप्टेंबर) आपला ३७ वा स्थापनादिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.