स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
भारतातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघे २ तास ७ मिनिटांचा असेल. रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
याबाबत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ही ट्रेन जेव्हा सुरू होईल, तेव्हा मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघे २ तास ७ मिनिटांचा असेल.
भारतातील ही पहिली बुलेट ट्रेन ५०८ किलोमीटरपर्यंत धावेल. ही रेल्वे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधून आपला प्रवास सुरू करेल. गुजरातमधील वापी, सुरत, आणंद, वडोदरा आणि अहमदाबादला ट्रेनचा अंतिम स्टॉप असणार आहे. ताशी ३२० किमी वेगाने धावत ही ट्रेन मुंबई-अहमदाबादचा प्रवास ३ तासात पूर्ण करेल. या दोन्ही शहरादरम्यान १२ स्टेशन असतील. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे १२ स्थानके बांधण्यात येतील. ३० जून २०२५ पर्यंत, या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
जपानच्या सहकार्याने सुरु असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गावर मानवीवस्तीत ध्वनी प्रदुषण होऊ नये म्हणून आतापर्यंत १०० किमी वायडक्टवर ध्वनीप्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून २००,००० नॉईज बॅरियर इन्स्टॉल करण्यात आलेले आहे.
याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांनी गुजरातमधील आगामी रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली, ज्यात पोरबंदर आणि राजकोट दरम्यान एक नवीन ट्रेन, राणावाव स्टेशनवर १३५ कोटी रुपयांची कोच देखभाल सुविधा, पोरबंदर शहरातील एक रेल्वे उड्डाणपूल, दोन गति शक्ती कार्गो टर्मिनल आणि भावनगरमधील नवीन बंदरात एक कंटेनर टर्मिनल यांचा समावेश आहे.
निसर्गाचा नजाराही पाहता येणार
बुलेट ट्रेनच्या प्रचंड वेगामुळे हवेचा प्रतिरोधाने होणारा ध्वनी आणि चाकांच्या घर्षणाने होणारा ध्वनी कमी करण्यासाठी ध्वनिरोधक बसविण्यात येत आहेत. या प्रत्येक ध्वनिरोधकांची उंची दोन मीटर तर रुंदी १ मीटर इतकी आहे. त्याचे वजन ८३०-८४० किलोग्रॅम आहे. निवासी आणि शहरी भागात तीन मीटरच्या उंचीचे बॅरियर्स बसविण्यात आले आहे. यात दोन मीटर काँक्रीट बॅरीयरच्यावर एक अतिरिक्त पारदर्शक पॉली कार्बोनेट पॅनल बसविण्यात येणार आहे.त्यामुळे बुलेट ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेरील निसर्गाचा नजारा पाहाता येणार आहे.






