जपानमधील गोल्डन क्लासिकल म्युझिक अवॉर्ड्समध्ये पटकावले सुवर्णपदक
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
मुंबईची १२ वर्षांची वंशी मुदलियार हिने ‘गोल्डन क्लासिकल म्युझिक’ अवॉर्ड्स २०२५ मध्ये सुवर्णपदक पटकावत भारताची मान उंचाविली.
२० ऑगस्ट रोजी आशियातील प्रतिष्ठित टोकियो ओपेरा सिटी कॉन्सर्ट हॉल येथे झालेल्या लाईव्ह सादरीकरणात तिने मोहक आवाजाने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली. वंशी मुदलियार हिने जगासमोर भारतीय संगीताची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या स्पर्धेत जगभरातील अनेक प्रतिभावान कलाकारांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीला ऑनलाईन व्हिडिओ ऑडिशन झाले, त्यातून निवड झालेल्या कलाकारांना १८ ते २० ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये थेट सादरीकरण करण्याची संधी मिळाली. वंशीने या संधीचे सोने करत सुवर्णपदक पटकाविले. पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या स्पर्धा आतापर्यंत प्रामुख्याने युरोप, अमेरिका आणि रशियाच्या कलाकारांनी जिंकल्या आहेत अशा परिस्थितीत वंशाचे यश भारतासाठी फार महत्वाचे आहे.
वंशीच्या या प्रवासामागचे रहस्य म्हणजे तिने यासाठी घेतलेले पाच वर्षांचे कठोर प्रशिक्षण. तिने पुण्यातील राहेल म्युझिक अकॅडमीमध्ये राहेल शेकटकर यांच्याकडे पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. मुंबई-पुणे अंतर असूनही गुरु-शिष्य नात्याने निर्माण केलेली जिद्द आणि सातत्य यामुळे वंशीने दोन मोठी आंतरराष्ट्रीय पदके जिंकून भारताचं नाव उज्ज्वल केले आहे. राहेल म्युझिक अकॅडमी आता पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे आणि वंशीचे यश हे त्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. फक्त १२ वर्षांच्या वयात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतामध्ये प्रभुत्व मिळविणं हे सोपे काम नाही. या प्रकारच्या संगीतासाठी सातत्यपूर्ण मेहनत, आवाजावर नियंत्रण, भावनिक अभिव्यक्ती आणि धैर्य आवश्यक असते. वंशीने दाखवून दिलं आहे की योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास भारतीय मुले जागतिक पातळीवर चमकू शकतात.
मुंबई ते व्हिएन्ना आणि आता टोकियो हा प्रवास फक्त एका कलाकाराचा नाही, तर भारताच्या नव्या पिढीच्या क्षमतेचं हे द्योतक आहे. वंशीने सिद्ध केलं की संगीत ही खर्या अर्थाने सीमांच्या पलीकडची भाषा आहे जी जगाला एकत्र आणते. आज ती जागतिक स्तरावर भारतीय संगीतकलेचं नवं प्रतीक बनली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवले दुसर्यांदा यश
हे यश वंशीसाठी विशेष ठरले कारण गेल्या वर्षीच म्हणजे २०२४ ला तिने व्हिएन्ना इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल मध्ये सिल्व्हर मेडल पटकाविले होते. त्यामुळे सलग दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जिंकणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय कलाकार ठरली आहे. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांमध्ये एकाच वेळी तिने दमदार छाप पाडली आहे.






