स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे केरळहून
केरळच्या मलप्पूरम येथे इथल्या ४२ वर्षीय बिंदू आणि त्यांचा २४ वर्षांचा मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाची परीक्षा एकाच वेळी दिली आणि दोघेही त्यात पास झाले आहेत. बिंदू या परिक्षेत ९२वा रँक मिळवत लास्ट ग्रेड सर्वंटची परीक्षा पास झाल्या आहेत, तर विवेकने ३८वा रँक मिळवत अप्पर श्रेणी लिपिक (एलडीसी) परीक्षा पास झाला आहे. आता मायलेक दोघेही सरकारी नोकरीत कार्यरत आहेत.
बिंदू आणि विवेक यांचा हा प्रवास सोपा नव्हता. बिंदू यांनी आपल्या मुलाला दहावीत असताना अभ्यास करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. परंतु, यामुळे त्यांच्यातील वाचनाची आवड वाढत गेली आणि त्या केरळ लोकसेवा आयोग (पीएससी) परीक्षेची तयारी करण्यास प्रेरित झाल्या. या स्पर्धा परीक्षा असल्यामुळे प्रत्येक पुढच्या परीक्षांमध्ये मोठं अंतर असतं. हे त्यांच्या लक्षात आले. पहिल्या परीक्षेनंतर दुसर्या परीक्षेची पुढील फेरी तीन वर्षांनी जाहीर केली जाते. त्यामुळे या परीक्षेतील अंतरामुळे किंवा फोकस ठेवून अभ्यास न केल्यामुळे त्या या पीएससी परीक्षेत तीन वेळा उत्तीर्ण होऊ शकल्या नाही. यानंतर मात्र, त्यांनी पूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यायचं असं ठरवलं. अडथळ्यांना न जुमानता ध्येय कायम ठेवले आणि चौथ्या प्रयत्नात त्यांनी पोस्ट काढली. ही परीक्षा देण्याआधी दहा वर्ष बिंदू यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम केले.
याविषयी बिंदू म्हणतात की, ‘पीएससी उमेदवारासाठी तुमच्याकडे काय असावे आणि काय नसावे याचे मी उत्तम उदाहरण आहे. मी परीक्षेत पास झाले, याचा अर्थ मी सतत अभ्यास केला असे नाही. परीक्षेच्या सहा महिने आधीच मी अभ्यासाची तयारी सुरू केली. मग पुढच्या परीक्षेपर्यंत ब्रेक घेतला. माझ्या या परीक्षेच्या अभ्यासामध्ये शिक्षकांनी, मित्रांनी आणि मुलाने खूप मदत, मार्गदर्शन केले.
बिंदू यांचा मुलगा विवेक सांगतो, आई आणि मी परीक्षा एकत्र दिली. मात्र, आम्ही एकत्र पास होऊ असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. तसेच या परीक्षेदरम्यान आम्ही कधीच एकत्र अभ्यास केला नाही. कारण मला एकट्याला अभ्यास करायला आवडायचं, तर आईला घरातली कामं, अंगणवाडीच्या कामातून वेळ मिळेल तसा ती अभ्यास करायची. आम्ही काहीवेळा फक्त एकत्र काही विषयांवर चर्चा करायचो.