स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे, आपल्या मुंबईतून…
‘भाषा’ हे आपले विचार शब्दातून व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम..जगभरातून हजारो भाषा बोलल्या जातात आणि महाराष्ट्राची मातृभाषा म्हणजे आपली लाडकी मराठी. प्रदेशानुसार तिची रूपे आणि लय बदलतच असते, परंतु तिची मुळातली गोडी मात्र तशीच अबाधित राहते. डोंबिवली येथे राहणारे कौशिक लेले २०१२ पासून जगभरातील अनेकांना मोफत शिकवत आहेत. त्यांनी आपल्या मायबोलीचा सातासमुद्रापार विस्तार करण्याचे जणू व्रतच घेतले आहे.
जर्मनी, कोस्टारिका, युके, जपान, अमेरिका, चीन, ब्रिटन अशा अनेक देशातील नागरिकांचा आणि अधिकतर तरुणाईचा समावेश आहे. मराठी भाषा शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांना कौशिक मोफत मराठी आणि गुजराती भाषेचे प्रशिक्षण देतात. हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून त्यांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात येते.
विशेष म्हणजे स्वतःची नोकरी सांभाळून कौशिक यांनी हे अतिशय स्तुत्य काम हाती घेतले आहे. कौशिक प्रशिक्षण देत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकांचा समावेश आहे. काही जण मराठी भाषेतून पी. एच. डी करत आहेत. काही जणांचा साथीदार मराठी भाषिक आहे. तर काही जणांचे मित्र मैत्रिणी मराठी आहेत. कारणे अनेक असली तरीही मराठी भाषा आत्मसात करण्याची ओढ आणि उत्सुकता मात्र दांडगी आहे. इंग्रजांकडून मिळालेली इंग्रजी भाषा जशी आपल्या अंगवळणी पडली तशीच आता आपली मराठी भाषा सुद्धा जगभरातील अनेकांना मुखोद्गत करण्याचे काम कौशिक करत आहेत.
आधी ब्लॉग्स मार्फत आणि मग वाढता प्रतिसाद बघता वेबसाइट आणि मग यू ट्यूबच्या माध्यमातून कौशिक जगाच्या कानाकोपऱ्यात मराठीचा प्रसार करत आहेत. मराठी सोबतच त्यांना हिन्दी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, चिनी अशा अनेक भाषा त्यांना येतात. या माध्यमातून जगभरात अनेकांना आपल्या मराठी भाषेचा गोडवा अनुभवता येतोय आणि ती शिकता येते आहे ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.
मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी कौशिक लेले करत असलेले प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कामासाठी खूप सार्या शुभेच्छा आणि कौशिक लेले यांच्या विषयी आम्हाला अधिक माहिती दिल्याबद्दल स्वदेश न्यूज आणि पराग पोतदार यांचे आभार.
धन्यवाद.
अभिनंदन सर