स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून
देशभरातील पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांकडे मोठ्या संख्येने पर्यटक – भाविकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारने पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे रोप वे ने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात ४५ ठिकाणी रोप वे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या ४५ प्रकल्पांत मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ५ प्रकल्पांचा समावेश आहे. देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान, अलिबाग आणि घारापुरी (एलिफंटा) या पर्यटनस्थळांचा त्यात समावेश आहे.
रोप वे मध्ये ओव्हरहेड केबल वायर आणि इलेक्ट्रिक मोटारच्या मदतीने प्रवाशांची ये-जा केली जाते. फ्रान्समधील लियोन येथे १८६२ मध्ये पहिला रोप वे उभारण्यात आला होता. पण पहिल्या केबल रोप वे ची निर्मिती लंडनमधील अँड्र्यू स्मिथ हॅलिडी यांनी १८७३ मध्ये केली. पुढे रोप वे च्या तंत्रज्ञानात अनेक बदल होत गेले आणि हा वाहतूक पर्याय अधिकाधिक अत्याधुनिक तसेच सुरक्षित होत गेला. आज जगभरात रोप वे चा वापर पर्यटनासह वाहतुकीसाठी केला जातो. महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी १९९६ मध्ये रोप वे बांधण्यात आला. या रोपवेसह राज्यात, एमएमआरमध्ये अनेक ठिकाणी रोप वे प्रकल्प राबविले जाणार आहेत.
देशभरातील पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे रोप वेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम ‘पर्वतमाला’ची घोषणा केली होती. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात रोप वे प्रकल्प राबविण्यासाठी २०२४ मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग लाॅजिस्टीक व्यवस्थापन लिमिटेडबरोबर (एनएचएलएमएल) सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आता राज्यात ४५ रोप वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
राज्य सरकारने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून राज्यात एनएचएलएमएलच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या ४५ पैकी २९ रोप वे प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे शासन निर्णयानुसार राज्य सरकारकडून राबविण्यात येणार्या १६ रोप वे प्रकल्पांतील नेरळ – माथेरान रोप वेची जबाबदारी एमएमआरडीकडे सोपविण्यात आली आहे.
४५ रोप वे प्रकल्प कुठे?
राज्यातील ४५ धार्मिक आणि पर्यटनस्थळे रोप वेने जोडली जाणार आहेत. त्यानुसार रायगड विकास प्राधिकरण (सार्वजनिक बांधकाम विभाग) रायगड किल्लावर जाण्यासाठी १.५ किमी लांबीचा रोप वे बांधणार आहे. तर नेरळ-माथेरान (१२ किमी) रोप वे प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविला जाणार आहे. अलिबागमधील कुणकेश्वर (३.९) येथील प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडून, अलिबाग चौपाटी – अलिबाग किल्ला (३ किमी) रो पवे प्रकल्प अलिबाग नगर परिषदेकडून, घारापुरी लेणी (३ किमी) प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडून राबवविला जाणार आहे. तर श्री खंडोबा निमगाव खेड (१ किमी), सिंहगड किल्ला (२.२ किमी), महाबळेश्वर (२ किमी), प्रतापगड किल्ला (१किमी), सज्जनगडमधील परळी किल्ला (१.२ किमी), उरमोडी धरण – कास पठार (१० किमी), सातारा शहर – अजिंक्यतारा (०.६ किमी) आणि ठोसेघर धबधबा (०.५ किमी) हे रोप वे प्रकल्प सावर्जनिक बांधकाम विभागाकडून राबविले जाणार आहेत. श्री उत्तरेश्वर मंदिर (५.४३ किमी) प्रकल्प एमएसआरडीसीकडून, तर महामंडळाकडून तर रेणुका माता, नांदेड (३.५ किमी) रोप वे प्रकल्प केंद्रीय मार्ग निधी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून राबविला जाणार आहे. एनएचएलएमएलकडून बाणकोट किल्ला (६.५ किमी), केशवराज मंदिर असुध (२.५ किमी), माहुली गड, ठाणे (२.४ किमी), सनसेट पॉइंट जव्हार (२ किमी), सुवर्णदुर्ग किल्ला (१.५ किमी), गगनगिरी मंदिर (६ किमी), राजगड किल्ला (१.४ किमी), शिवनेरी किल्ला (१.५ किमी), अष्टविनायक लेण्याद्री (०.८ किमी), दर्या घाट, पळू (३.२ किमी), पन्हाळा ज्योतिबा (३ किमी), विशाळगड (३ किमी), भीमाशंकर (२ किमी), हरिहर किल्ला (१.५किमी), ब्रह्मगिरी – अंजनेरी (५.८ किमी), मांगीतुंगी, नाशिक (४.५ किमी), चंद्रेश्वरम महादेव मंदिर (३ किमी), कळसूबाई शिखर (२.५ किमी), हरिश्चंद्र किल्ला (२ किमी), तोरणमाळ (२.८ किमी), हनुमान टेकडी मंदिर, छत्रपती संभाजीनगर (२.७ किमी), वेरूळ लेणी (६.१ किमी), अंजठा लेणी (५.४ किमी), कानिफनाथ गड (३.६ किमी), नागपूर मेट्रो स्थानक (५ किमी), रामटेक (०.६ किमी) आणि गोसेखुर्द धरण (१.१ किमी) या २९ प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
एमएमआरमध्ये पाच रोप वे प्रकल्प
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम – पर्वतमालाअंतर्गत राज्यात राबविण्यात येणार्या ४५ रोप वे प्रकल्पांपैकी पाच प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आहेत. देशाच्या आर्थिक विकास वाढीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी केंद्राने एमएमआरचा विकास ग्रोथ हब म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक व्यवस्था मजबूत करून पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी एमएमआरडीएने रोप वे प्रकल्प राबविण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. त्यानुसार एमएमआरमधील सर्व मेट्रो स्थानके रोप वे प्रकल्पाने जोडण्यासाठी एमएमआरडीए अभ्यास करणार आहे. यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. आता राज्य सरकारने एमएमआरमध्ये पाच रोप वे प्रकल्प हाती घेतले आहेत. यात देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या माथेरान, अलिबाग आणि घारापुरी या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. नेरळ – माथेरान, अलिबाग चौपाटी – अलिबाग किल्ला, माहुली गड (ठाणे), कुणकेश्वर (अलिबाग) आणि घारापुरी (एलिफंटा) या पाच ठिकाणी रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पांची अंमलबजावणी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांकडून केली जाणार आहे.