- जाणून घ्या ही योजना
स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून
केंद्र सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते. सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दीदी ही योजनादेखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचे स्वरुप काय आहे? हे जाणून घेऊ या….
योजनेचा उद्देश काय?
गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकातर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत
ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. देशातील तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा.
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करायचा?
लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. या आराखड्याची तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.