स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून
आता सरकारच तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली असून शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक मदत देणे, डिजिटल फायनान्सला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना बियाणे, खते, कृषी अवजारे व इतर गरजांसाठी निधी सहज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.
अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेला मुदतवाढ
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. याचा फायदा विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच पशुपालन व मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थसंकल्प 2025 नुसार अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा आतापर्यंत कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही होणार आहे.
👍🌱