स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः
आजची चांगली बातमी आहे अमेरिकेतून…
‘एज इज जस्ट ए नंबर’ ही म्हण दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांना अगदी तंतोतंत लागू पडते. ‘विश्वरूपम’, ‘चाची चारसो बीस’, ‘विक्रम’, ‘इंडियन’ अशा अनेक चित्रपटांतून कमल हसन यांनी फक्त आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले नाही तर त्यांच्या चित्रपटात तंत्रज्ञनाचा पुरेपूर वापर करून रसिकांना नेहमीच चकित केले आहे. हृदयाने चिरतरुण असलेला हा अभिनेता आता ‘आर्टिफिशीयल इंटेलिजन्स’ अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडला आहे. वयाच्या 69 व्या वर्षी स्वतः एआयचे धडे गिरवण्यासाठी अमेरिकेतील त्यांनी एका विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.
कमल हसन यांचा देशातील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत समावेश आहे. कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतल्याने ते विशेष चर्चेत आले आहेत. अल्प-मुदतीच्या एआय कोर्समध्ये भाग घेण्यासाठी कमल हसन अमेरिकेला रवाना झाले आहेत.
कमल हसन यांनी ९० दिवसांच्या एआय कोर्समध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना भविष्यातील तंत्रज्ञान समजून घेऊन त्याचा चित्रपटांमध्ये वापर करायचा आहे. आगामी चित्रपट प्रकल्पांमध्ये एआय कौशल्यांचा वापर करणार असल्याने त्यांना हे तंत्रज्ञान स्वतःला अवगत करणे महत्त्वाचे वाटले आहे.
कमल हसन हे त्यांच्या चित्रपटातील नवनवीन प्रयोगांसाठी देखील ओळखले जातात. त्यांचा ‘विश्वरूपम’ हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्यामध्ये ‘ओरो 3D साऊंड टेक्नोलोजी’ चा वापर झाला होता. याशिवाय ‘मुंबई इक्स्प्रेस’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला ज्यात डिजिटल फॉरमॅटचा वापर झाला होता, भारतात पहिल्यांदा ‘इंडियन’ चित्रपटात ‘प्रोस्थेटिक मेकअप’ चा वापर झाला होता. असे अनेक तंत्रज्ञान कमल यांनी त्यांच्या चित्रपटातून भारतात आणले. आता त्यांच्या आगामी चित्रपटात एआयची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळू शकेल.