पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार
सन्मान मिळवणारे ठरले पहिले भारतीय
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली आहे. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी ही घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले की, ते मला त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. मी त्यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारू इच्छितो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे.”
मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी सांगितले की, १२ मार्च १९९२ रोजी मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून पाच परदेशी मान्यवरांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान १९९८ मध्ये नेल्सन मंडेला हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते.
पंतप्रधान मोदींना आतापर्यंत विविध देशांकडून २१ पुरस्कार मिळाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी बार्बाडोस, गयाना, रशिया, भूतान, फ्रान्स, इजिप्त आणि अमेरिका या देशांकडून सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.
सर्वांत मोठ्या पगडीचे देहूत लोकार्पण
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे देहूहून
जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे औचित्य साधून जगातील सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण देहूत पार पडले आहे.
पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून, उंची ४ फूट आहे. या पगडीची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस’मध्ये नोंद झाली आहे.
या प्रसंगी वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनकुमार सोलंकी, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे उपस्थित होते. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी याचे आयोजन केले आहे.
याविषयी दिलीप सोनिगरा म्हणाले, ‘संत तुकाराम महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा, प्रेम, स्नेह आहे. याच भावनेतून जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली आहे. ही पगडी दर्शनासाठी सर्वांना खुली आहे’.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे चरित्र दीपस्तंभ प्रमाणे
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी म्हटले आहे. तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये रोज दुपारी संत तुकाराम महाराज चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.