- सागरी पर्यटनाचे नवे पर्व सुरू होणार
- 200 क्रूज आणि 10 लाख प्रवासी क्षमता
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल महाराष्ट्रात बनले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल निर्माण केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुंबई शहरात लवकरच सागरी पर्यटनाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय सी-क्रूझ टर्मिनल आजपासून सेवेत दाखल होणार आहे. या टर्मिनलचे उद्घाटन सोमवारी (ता. 21) केंद्रीय बंदरमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे. या टर्मिनलवर सुमारे 200 क्रूझ आणि दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी क्षमता आहे.
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी सागरमाला उपक्रमांतर्गत मुंबई येथे टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती. ते जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते; मात्र विविध तांत्रिक विलंबामुळे डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पुढे गेले होते. त्यानंतर सर्व अडथळे दूर करून हे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलच्या उभारणीसाठी 495 कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी 303 कोटी रुपये मुंबई पोर्ट ट्रस्टने, तर उर्वरित खर्च खासगी ऑपरेटर्सकडून झाला.
टर्मिनलमुळे रोजगाराच्या संधी
टर्मिनलमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.सागरी पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना आणि जागतिक पातळीवर मुंबईचा नवा चेहरा उभा राहील. हॉटेलिंग, ट्रान्सपोर्ट, टूर गाइड्स, स्थानिक कलावंत आणि हस्तकला यांना या संधीचा मोठा लाभ होणार आहे.
काय आहेत टर्मिनलची वैशिष्ट्ये?
एकूण 4.15 लाख वर्ग फूट क्षेत्रफळावर हे टर्मिनल बांधण्यात आले आहे. यापैकी 1.7 लाख वर्ग जागा ऑपरेशनल स्पेस म्हणून वापरली जाणार आहे.
या टर्मिनलची दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवासी हाताळणीची क्षमता आहे. 200 हून अधिक जहाजांची ये-जा येथे होणार आहे. 22 उद्वाहने, 10 सरकते जिने व 300 वाहनांसाठी बहुस्तरीय पार्किंग असणार आहे.