स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे
देशातील सर्वात मोठ्या दुचाकी कंपनींपैकी एक असलेल्या हिरो मोटोकॉर्प ने हर्षवर्धन चितळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. ही जबाबदारी ते ५ जानेवारी २०२६ पासून स्वीकारणार आहेत. कंपनीने हा निर्णय ८ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केला आणि त्यानंतर संपूर्ण उद्योगविश्वाचे लक्ष त्यांच्या दिशेने वळले आहे.
महाराष्ट्रातील एका साध्या मराठी कुटुंबातून आलेल्या हर्षवर्धन चितळे यांनी बालपणापासूनच शिक्षणात आपली चमक दाखवली. शाळेत गणित व विज्ञान या विषयांत ते नेहमी अव्वल राहिले. वडील अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे घरात अभ्यासाला नेहमी प्रोत्साहन मिळाले, तर आईने अखंड पाठिंबा दिला. पुढे आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि ‘डायरेक्टरस गोल्ड मेडल’ हा सन्मान पटकावला.
त्यांच्या करिअरची सुरुवात हनिवेल ऑटोमेशन इंडिया मधून झाली, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती फिलिप्स लायटिंग इंडिया मध्ये. तिथे त्यांनी कंपनीचे रूपांतर करून ती ‘सिग्निफाय’ या जागतिक ब्रँडमध्ये उभी केली. या विभागाने दरवर्षी अंदाजे ३३,००० कोटींचे उत्पन्न मिळवले. नंतर सिग्निफाय च्या प्रोफेशनल बिजनेस विभागाचे जागतिक सीईओ म्हणून त्यांनी ७० देशांतील १२ हजार कर्मचार्यांचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्यकाळात विभागाचा नफा दुप्पट झाला आणि दरवर्षी १०० हून अधिक नवनवीन प्रॉडक्ट्स बाजारात आले.
चितळे हे केवळ कॉर्पोरेट पुरते मर्यादित नाहीत, तर नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे एंजल इन्व्हेस्टर देखील आहेत. इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ ऊर्जा, हेल्थ-टेक आणि कृषी-टेक या क्षेत्रातील नव्या स्टार्टअप्समध्ये ते गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन केवळ नफा कमावण्यापुरता मर्यादित नसून समाजपरिवर्तन व शाश्वत विकासाकडे झुकलेला आहे.
त्यांच्या कुटुंबाने दिलेला आधार आणि संस्कार त्यांच्या यशाचे रहस्य आहे. शिस्त, प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिकवण त्यांना वडिलांकडून मिळाली, तर आईने पुढे जाण्याची हिंमत दिली. आज त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला अभिमान वाटतो.
याविषयी हिरो मोटोकॉर्प चे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी सांगितले की, चितळे यांच्या नेतृत्वामुळे कंपनी इलेक्ट्रिक मोबिलिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, प्रीमियम प्रॉडक्ट्स आणि सस्टेनेबिलिटीच्या दिशेने पुढे जाईल.






