बारामतीची ४० मेट्रिक टन मिरचीची दुबईवारी
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बारामतीहून
बारामतीतील ३० महिला शेतकर्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादन नुकतेच दुबईला निर्यात केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) तर्फे ग्रामीण महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देश ठेवण्यात आला आहे. त्याद्वारे ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे आता इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळत आहे.
या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण महिलांनी कृषी क्षेत्रात नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्य विकसित झाले आहे. ग्रामीण महिला जागतिक कृषी मूल्यसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, हे या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी संघर्ष क्लस्टर मायक्रो रिसोर्स सेंटर, बारामती यांच्या माध्यमातून झाली. कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच खरेदी व बाजारपेठेसाठी आदी नेचर फूड्स प्रा. लि. यांच्याशी खरेदी हमी करार करण्यात आला होता. २२ एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या शेतीत ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, सेंद्रिय खतांचा वापर व एकात्मिक कीड व्यवस्थापनासारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात आला. नेदरलँड तंत्रज्ञानावर आधारित उगमशिव मिरचीची रोपेही यात वापरण्यात आली.
एकूण उत्पादनात प्रति महिला सरासरी ६,००० किलो मिरची मिळाली. त्यात स्मिता पवार ७,६९२.५ किलो, रोहिणी जाधव ७,६६७.५ किलो आणि राणी जामधडे ६,०५२.५ किलो यांचे विशेष योगदान राहिले. अनियमित पाऊस, काढणी नंतरची गुणवत्ता व निर्यातीतील आव्हाने यावर मात करण्यासाठी सतत फील्ड मार्गदर्शन, पीक विमा सल्ला व प्रक्रिया प्रशिक्षण दिले गेले. पुढील टप्प्यात उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी स्थळावर ग्रेडिंग युनिट उभारण्याची योजना आहे.
बारामतीचा हा यशस्वी उपक्रम ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक ‘स्केलेबल व रीप्लिकेबल मॉडेल’ ठरत आहे.