स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे बेंगळुरूतून…
आपण लहानपणी उडत्या तबकडीची आणि अल्लाद्दिनच्या उडत्या चादरीची गोष्ट ऐकलेली होती. फँटसीच्या जगातल्या या गोष्टी वास्तवात मात्र आपल्याला खोट्या वाटतात. पण थोडं थांबा… अवघ्या दोन वर्षांच्या काळात भारतातसुद्धा या उडत्या तबकड्या अगदी सहजतेने फिरताना दिसू लागणार आहेत. बेंगळुरूमधून याची सुरुवात होणार असून उडत्या टॅक्सी सुरू करण्याच्या दिशेने हे शहर आता वेगाने पावले टाकू लागले आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळुरू हे देशातील आयटी हब म्हणून ओळखले जाते. परंतु भारतातील अनेक शहरांसह हे शहरदेखील वाहतूक कोंडीने ग्रासलेले आहे. या वाहतूक कोंडीतून तेथील रहिवाश्यांची सुटका करण्यासाठी आता उडणाऱ्या टॅक्सी साकारल्या जात आहेत. त्यामुळे एरवी ज्या प्रवासाला तास-तास लागायचे ते आता अगदी काही मिनिटांत होऊ शकतील. बेंगळुरूमध्ये लवकरच आकाशातून उडत जाणाऱ्या टॅक्सी दिसतील आणि आपल्या जादुई दुनियेतील स्वप्न प्रत्यक्षात येताना दिसेल.
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, सरला एव्हिएशन आणि बेंगलुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) मिळून शहरात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करणार आहेत. ही एअर टॅक्सी शहरातील प्रमुख ठिकाणी आणि विमानतळाजवळ प्रथमतः सेवा देणार आहेत. या रिपोर्टनुसार, भागीदारी अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या एअर टॅक्सी केवळ वेळच वाचणार नाहीत, तर त्यामुळे शहरातील प्रदूषणही कमी होणार आहे. ही एअर टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.
हो.. पण भाडे किती?
एअर टॅक्सीने प्रवास केल्यास आपला बराच वेळ वाचणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने बेंगळुरूमध्ये इंदिरानगर ते विमानतळापर्यंत प्रवास केला तर त्याला साधारण 1.5 तास लागतील, तर या फ्लाइंग टॅक्सीमुळे हाच प्रवास फक्त 5 मिनिटात पूर्ण होऊ शकेल. ही एअर टॅक्सी सुरू झाली तर 20 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती 1700 रुपयांचा खर्च येऊ शकतो.
अशी सेवा प्रत्यक्षात येऊ शकेल यावर अद्यापही अनेकांचा विश्वास नाही. परंतु विमान, हेलिकाॅप्टर सेवा दाखल होईपर्यंत देखील असेच वाटत होते की आकाशातून प्रवास शक्य नाही. त्यामुळे ही देखील अशक्य गोष्ट नाही. येत्या दोन वर्षांत कदाचित बेंगळुरूमधील नागरिक उडत्या टॅक्सीतून ये-जा करतील आणि त्यांचे अनुकरण करून कदाचित पुण्या-मुंबईतदेखील या उडत्या टॅक्सी अवतरतील…