राजस्थानमधील डॉ.रामेश्वरम यादव यांनी सुरू केली मोफत बससेवा
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे थेट राजस्थानहून
राजस्थानमधील चूरी गावचे डॉ. रामेश्वरम यादव यांनी गावातील मुलींसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. ‘निःशुल्क बेटी वाहिनी’ या नावाने ओळखली जाणारी ही बस चूरी आणि जवळपासच्या गावांमधील मुलींना घेऊन सुरक्षितपणे कॉलेजला पोहोचवते आणि पुन्हा घरी सोडते. यामुळे दुर्गम गावातील अनेक मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वरम प्रसाद यादव हे राजस्थानमधील आपल्या चूरी गावाकडे जात असताना त्यांनी पावसात भिजत पायी चालणार्या चार मुलींना दररोज १८ किमी अंतर पार करून कॉलेजला जाताना पाहिले. यामुळे त्यांचे ह्दयपरिवर्तन होऊन त्यांनी मुलींचा शाळा, कॉलेजमध्ये जाण्याचा प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी मोफत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी तारावती यांनी खंबीरपणे साथ दिली. यादव दाम्पंत्याने मुलींसाठीा.’निःशुल्क बेटी वाहिनी’ ही मोफत बससेवा सुरू केले. मात्र, हे करत असताना शासनाकडून त्यांनी कोणतीही अपेक्षा केली नाही. त्यांच्या या बससेवेमुळे अनेक मुलींचा शिक्षणाच्या प्रवासाचा मार्ग सुखकर झाला आहे. आज चुरीसह जवळच्या गावांमधून मुलींना घेऊन ही बस सुरक्षितपणे कॉलेजला पोहचवते आणि पुन्हा घरी सोडते. यामुळे आता पालकही निर्धास्त झाले आहेत.
मुलींशी संवाद साधताना या दांपत्याला कळलं की गावाहून ६ ते ७ किमी अंतरावर असलेल्या सार्वजनिक बसस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी त्या मुलींना उन्हाळा, पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत चालत जावं लागतं. सार्वजनिक बसने प्रवास करताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे समजल्यानंतर अनेक वर्षांपूर्वी आपल्या सहा महिन्यांची लहान मुलगी आजारामुळे गमावलेल्या या दाम्पत्याने घरी जाऊन या विषयावर चर्चा केली आणि मुलींसाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. यादव यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडमधून १७ लाख रुपये काढले आणि त्यात स्वतःच्या साठवलेल्या बचतीमधून आणखी २ लाख रुपये टाकून १९ लाख रुपयांची ४०-सीटर टाटा स्टार बस खरेदी केली. त्यांनी ही बस गावातील मुलींसाठी मोफत सेवा म्हणून सुरू केली. जिथे स्वतः डॉ. यादव वर्षानुवर्षे जुनी मारुती ८०० चालवतात, तिथे या बससाठी दरमहा टोल टॅक्स, डिझेल, ड्रायव्हर आणि कंडक्टचा हजारो रुपयांचा खर्च ते स्वतः करतात.
डॉ. यादव यांच्या या उपक्रमामुळे गावकरी आता मुलींना कोणतीही चिंता न करता शिक्षणासाठी पाठवू शकत आहेत. शिक्षणाचा मार्ग सुलभ करणार्या या बससेवेने अनेक मुलींच्या आयुष्याला नवा प्रकाश दिला आहे. डॉ. यादव यांच्या या कार्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.