स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
जन्मतःच कर्णबधिर असलेला ओंकार मोकाशी त्याच्या लढाऊ बाण्यामुळे अभिमान आणि कौतुकास पात्र ठरला आहे. कुस्ती व ज्युडोमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सहा पदके पटकाविलेला ओंकार सध्या कोथरूडमधील एक्स सर्व्हिसमन कॉलनीतील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. कुस्ती क्षेत्रात पोहोचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अतिशय रंजक व स्फूर्ती देणारा आहे.
ओंकार हा जन्मतःच कर्णबधिर असल्याचे समजल्यावर त्याच्या पालकांनी खचून न जाता त्याला जीवनाशी लढण्याचे शिक्षण दिले. ओंकार मोकाशी याच्या कानाला मशिन लावत, स्पीच थेरपी करत पालकांनी त्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले. त्यानेही बीएडपर्यंत शिक्षण घेत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
ओंकारला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. त्याचे वडील, चुलत भावंडे व बहिण असे सगळेच पैलवान होते. त्यामुळे वयाच्या १२व्या वर्षापासूनच गणेश दांगट यांच्या हनुमान व्यायामशाळेत ओंकार सरावासाठी जाऊ लागला. १०वी व १२वी तो उत्तम गुणांनी पास झाला. १२वीला असतानाच चेन्नई येथे झालेल्या कुस्तीत त्याने पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर पदवीधर होऊन त्याने आईचे शिक्षणाबाबतचे स्वप्न पूर्ण केले.
वडिलांची इच्छा होती की, ओंकारने पैलवान होऊन सरकारी नोकरी करावी. त्याच्याकडे राष्ट्रीय पातळीवरील सहा पदके होतीच. सह्याद्री अकादमीमध्ये ज्युडोचे प्रशिक्षण घेऊन राजस्थान, दिल्ली, हरियाणा येथे झालेल्या ज्यूडो स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके पटकाविली होती. त्यामुळे सरकारी क्रीडा कोट्यातून पोस्ट विभागात त्याला दीड वर्षांपूर्वी नोकरीची संधीही मिळाली.
क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर स्वावलंबी होत त्याने वडिलांचेही स्वप्न पूर्ण केले. ओंकारला कुटुंबातील सदस्यांची आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या आपल्या सहकारी मित्रांची चांगली साथ लाभली. जानेवारी महिन्यात ठाणे येथे महाराष्ट्र कर्णबधिर, वरिष्ठ कुस्ती आणि ज्यूडो स्पर्धा, महाराष्ट्र स्पोर्ट्स काउंसिल ऑफ द डेफ कुस्ती ८६ किलो आणि ज्यूडो ९० किलो स्पर्धेत चांगली कामगिरी करत त्याने तीन सुवर्णपदके पटकाविली. आता ऑल इंडिया काउंसिल ऑफ दे
डेफ सीनियर नॅशनल, मध्यप्रदेश येथील स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याने आतापर्यंत १० वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळून सहा पदके मिळवली आहेत, आता एवढयावरच न थांबता त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारीदेखील सुरू केली असून लवकरच त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीकर खेळण्याचे स्वप्नदेखील तो पूर्ण करणार आहे.
महाराष्ट्र ऑफ द डेफ, पुणे क्लबचे अध्यक्ष अशोक मोरे, सचिव प्रसाद पिंपळे, चेतन जोशी, गोपाल बिरारे, इरशाद खान यांच्या मार्गदर्शनाखाली माझी कारकीर्द बहरत असल्याचे ओंकारने सांगितले.
Good