स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी पुण्याहून…
राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल विकसित केले आहे. यावर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येत असून त्यामुळे थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागणार नाही. रक्ताविषयी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कॉर्पोरेशन, प्रायव्हेट अशा एकूण ३९५ रक्तपेढ्यांचे, रक्त केंद्रांचे खूप मोठे जाळे असून, रुग्णाला वेळेत रक्त मिळण्यासाठी आपल्या मोबाइलवर ई-रक्तकोष पोर्टलमार्फत सद्यःस्थितीत असलेला रक्ताच्या साठ्याची माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. सोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होईल. ज्या रुग्णांचे रक्त निगेटिव्ह गटाचे आहे त्यांनाही या पोर्टलद्वारे रक्ताच्या उपलब्धतेची माहिती मिळणार आहे.
रक्त संकलनामध्ये देशात प्रथम
रक्त संकलनामध्ये देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी अंदाजे २१ लाख रक्तदात्यांनी राज्यात रक्तदान केले. या रक्त संकलनातून मोठ्या प्रमाणात रक्त घटक तयार केले. ज्यामध्ये पॅक्ड रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा याचा समावेश असून, सदर रक्त घटक आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. राज्य रक्त संकलन परिषदेने हे रक्त व रक्त घटकाच्या प्रोसेसिंग चार्जेसचे दर निश्चिती केलेली आहे. या दर निश्चितीच्या मर्यादेतच रक्त केंद्रांना रुग्णासाठी रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे.
रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत
महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांमार्फत रक्त संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. राज्यामध्ये शंभरपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी संख्या आहे. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा मिळेल.