८५ व्या वर्षी धीरा चालिहा यांची अवकाश भरारी
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे आसामहून
आसामच्या पहिल्या महिला पायलट धीरा चालिहा यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी म्हणजेच ६५ वर्षांनंतर पुन्हा आकाशात भरारी घेतली. धीरा चालिहा यांनी २१ व्या वर्षी आसामची पहिली महिला पायलट म्हणून इतिहास रचला होता आणि आता पुन्हा एकदा ‘टायगर मॉथ’ विमानातून उड्डाण करून त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे.
धीरा चालिहा यांचा जन्म १९४० मध्ये जोरहाट येथे झाला. बालपणातील कुतूहल ते सामाजिक बंधनांना आव्हान देत त्यांचा पायलट बनण्याचा प्रवास रंजक राहिला आहे.
जोरहाटमधील घराच्या मागील अंगणात असलेल्या सर्वात उंच झाडावरून त्यांना युद्धाचे मैदान दिसत असे. तिथेच त्यांच्या पायलट बनण्याचे बीज अंकुरले आणि त्या पायलट बनण्याच्या स्वप्नांशी जोडल्या गेल्या.
त्या आठ वर्षांची असताना, कुटुंब गुवाहाटीला स्थलांतरित झाले. तिथे हेंडिक कॉलेज गुवाहाटी येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९५९ साली वडिलांच्या सांगण्यावरून दोन वर्षांत पायलट बनण्यासाठी ६ पूर्ण अनुदानीत प्रशिक्षण शिष्यवृत्तींसाठी त्यांनी अर्ज केला. मात्ऱ, आई अनामिका चालिहाला यांना ते आवडले नव्हते. पण वडिलांच्या पाठिंब्याने त्या मुलाखतीसाठी गेल्या. त्यांची निवड होऊन आसाम फ्लाइंग क्लबचे चिन्ह असलेली जीप त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना प्रशिक्षणासाठी बोरझारला घेऊन गेली. हे प्रशिक्षण दोन विमानांवर होते ते म्हणजे टायगर मॉथ आणि स्थानिक पुष्पक. तिथेच त्यांचे पहिले एकट्याने उड्डाण झाले आणि वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी पायलटचा परवाना मिळवला. आता त्या गुवाहाटीहून तेजपूर, जोरहाट किंवा शिलाँगला विमानाने जायला लागल्या. अखेर ६० तासांचे एकटे उड्डाण पूर्ण करत धीरा चालिहा आसाममधील पहिल्या महिला वैमानिक झाल्या.
दोन वर्षांनंतर त्यांचे लग्न गायक-संगीतकार आणि गीतकार कर्णल हजारिका यांच्याशी झाले आणि त्या लंडनला गेल्या. अखेर लग्नानंतर विमानाने प्रवास करण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. असा त्यांचा हा प्रवास हेच दाखवून देतो की स्वप्ने कधीही कालबाह्य होत नाहीत.






