झोहोच्या रूपाने भारताचे डिजिटल दुनियेत आत्मनिर्भरतेचे पाऊल
न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे तमिळनाडूहून
भारतातून जगाला सॉफ्टवेअर क्षेत्रात नवे पर्व दाखवणारे नाव म्हणजे श्रीधर वेम्बू. श्रीधर वेम्बू यांच्या झोहोच्या रूपाने भारताने डिजिटल दुनियेत आत्मनिर्भरतेचे पाऊल टाकले आहे. आज झोहो ने ‘अराट्टई’ च्या रुपात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. अराट्टई म्हणजे ‘चॅट’. हे पूर्णपणे स्वदेशी अॅप व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून समोर आले आहे. यात चॅटिंग, कॉलिंग, ग्रुप्स, फाईल शेअरिंग अशी सर्व वैशिष्ट्यं मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे, हे अॅप भारतात बनलं असल्याने डेटा सुरक्षेबाबत भारतीय वापरकर्त्यांना आत्मविश्वास वाटतो आहे.
नुकतेच केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की मायक्रोसॉफ्ट ऐवजी ते त्यांच्या मंत्रालयात झोहोचा पर्याय स्वीकारतायेत. ही घोषणा अनेक अर्थांने क्रांतिकारी ठरली आहे.
या अॅपमुळे भारताकडे केवळ वापरकर्ते नाहीत, तर जगाला दिशा दाखवणारे तंत्रज्ञान तयार करण्याची ताकद आहे, हे वेम्बू यांनी सिद्ध केलं आहे. या अॅपमुळे लोकांना रोजगार मिळाला आहे, महिला सक्षमीकरण झाले आहे, शिक्षणाला चालना मिळाली आहे आणि रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. साध्या मोबाईलवरही हे अॅप सहज चालावं, याची खास काळजी यात घेतली गेली आहे.
नुकतेच श्रीधर वेम्बू यांच्या कंपनीची निर्मिती असलेले अराट्टई हे अॅप तीन दिवसांत शंभर पटीने वाढलेले आहे. अराट्टई हे झोहोचे चॅटींग अॅप आहे. तामिळ भाषेत या शब्दाचा अर्थ गप्पा असा होतो. अराट्टईबद्दल तर अनेक भारतीयांनी ऐकले सुद्धा नसेल. मात्र गेल्या काही दिवसांत या अॅपचे डाऊनलोड शंभरपट वाढलेले असून, हा एक विक्रम आहे. अराट्टईचे डाऊनलोड फक्त ३ हजार होते. ते आता वाढून ३० हजार झालेले आहेत. हे अॅप व्हॉट्सअॅपचा भारतीय पर्याय बनू पाहत आहे. २०२१ पासून हे अॅप बाजारात आहे. त्याबाबत फारशी चर्चाही नव्हती. पण आता हा अॅप झपाट्याने डाऊनलोड केला जात आहे.
सॉफ्टवेअर एज ए सर्व्हीस या क्षेत्रात झोहोने झपाट्याने विस्तार केला आहे. कंपनीचे बाजार मूल्य २०२४ मध्ये एक लाख तीन हजार ७६० कोटी रुपये आहे. जगातील ८० देशांमध्ये झोहोची कॉर्पोरटे कार्यालये आहेत. जगभरात १८ डेटा सेंटर असून अमेरिकेतही झोहोचा मोठा ग्राहक आहे.
याविषयी श्रीधर बेम्बु म्हणतात की, आमचे अॅप मेटाच्या अॅपपेक्षा वेगळे आणि प्रभावी आहे. ते स्वदेशी आणि सुरक्षित आहे. झोहोने या क्षेत्रात अमेरिकी कंपन्यांना आव्हान दिलेले आहे. अर्थात हे सोपे नाही. अमेरिकी कंपन्यांचे आकारमान आज हिमालयासारखे विशाल झालेले आहे, झोहो त्या तुलनेत एखाद्या टेकडीसारखी कंपनी आहे. परंतु, एक गोष्ट महत्वाची आहे. अराट्टई तेच काम करते जे व्हाट्सअॅपच्या माध्यमातून केले जाते. जे तंत्र मेटाकडे आहे, ते झोहोकडेही आहे. झोहोने आपल्याला आत्मविश्वास दिलेला आहे की, व्हाट्सअॅप नसले तरी भविष्यात आपले अडणार नाहीत. आपल्याकडे हक्काचा पर्याय आता निर्माण झाला आहे. भारत आता या क्षेत्रातही सीमोल्लंघनासाठी सज्ज आहे.