भारतीय लष्कराकडून मिळाली ऑर्डर
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अजमेरहून
राजस्थानच्या अजमेर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी जयंत खत्री आणि कोलकात्याच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शौर्य चौधरी यांनी एक फायटर ड्रोन तयार केला आहे. हैदराबादमधील बीआयटीएस पिलानी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचा उपयोग भारताच्या संरक्षण क्षेत्रात होणार आहे.
वीस वर्षांचे जयंत खत्री आणि शौर्य चौधरी यांनी बनविलेल्या जबरदस्त ड्रोनला भारतीय लष्कराने थेट ऑर्डर दिली आहे. या दोघांनी यासाठी ‘अपोलियन डायनॅमिक्स’ या नावाने एक स्टार्टअप देखील सुरू केले आहे.
जयंत आणि शौर्य यांनी हे ड्रोन आपल्या हॉस्टेलच्या रूममध्ये तयार केले. आतापर्यंत हे ड्रोन जम्मू, हरियाणातील चंडी मंदिर (हरियाणा), पश्चिम बंगालमधील पानागढ आणि अरुणाचल प्रदेश येथील लष्करी युनिट्सना पुरवण्यात आले आहेत. भारताची विदेशी ड्रोनवरची अवलंबता कमी करणे हा त्यांचा उद्देश आहे.
जयंत आणि शौर्य यांनी आपले प्राध्यापक संकेत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पार्ट्सपासून ड्रोन तयार केले. त्यामध्ये त्यांनी स्वतःचा सॉफ्टवेअर आणि कंट्रोल सिस्टम इन्स्टॉल केला. संपूर्ण तंत्रज्ञान हॉस्टेलमध्येच विकसित करण्यात आले आहे. त्या दोघांनी लष्कर अधिकार्यांना संदेश पाठवले. अनेक अधिकार्यांना संदेश केल्यानंतर एका कर्नलने प्रतिसाद दिला आणि चंदीगडमध्ये ड्रोनचे डेमो देण्याची संधी त्यांना मिळाली.
काय आहेत ड्रोनची खासियत ?
हे ड्रोन ३०० किमी/तास वेगाने उडू शकतात. १ किलोपर्यंत पेलोड वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. रडारला चुकवण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. प्रत्येक ड्रोन भारताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार अनुकुलित केले आहेत. या ड्रोनचा वापर बॉम्ब टाकण्यासाठी आणि रेसिंगसाठी करण्यात येणार आहे.
कशी झाली स्टार्टअपची सुरुवात?
जयंत आणि शौर्य यांनी कॉलेजमध्ये एक डिफेन्स-टेक क्लब सुरू केला होता. लष्कराकडून ऑर्डर आल्यावर त्यांनी ‘अपोलियन डायनॅमिक्स’ या नावाने स्टार्टअप रजिस्टर केलं आणि टीम बनवायला सुरुवात केली. आज त्यांच्या टीममध्ये आणखी सहा सेकंड ईयरचे विद्यार्थी आहेत, जे विविध प्रकारच्या ड्रोन प्लॅटफॉर्म्सवर काम करत आहेत – जसे की व्हीटीओएल (व्हर्टीकल टेक ऑफ अॅण्ड लँडिग), फिक्सड विन ड्रोन. याशिवाय ‘अपोलियन डायनॅमिक्स’ ची टीम लष्कराच्या जवानांना ड्रोन ऑपरेट करण्याचे प्रशिक्षणही देते आहे. विशेषतः अशा सैनिकांना ज्यांच्याकडे फ्लाइट अनुभव नाही.