स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे भोरहून
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरी भागातील कोंढरी गावातील एका साध्या हमालाच्या मुलीने दैदिप्यमान यश मिळवले आहे. निगुडघर येथील जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकणार्या आदिती पारठे हिची अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला भेट देण्यासाठी निवड झाली आहे. तब्बल १६ हजार १२१ विद्यार्थ्यांमधून तिने ही संधी मिळवत आपला ठसा उमटवला आहे.
पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणार्या विशेष उपक्रमांतर्गत, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी दिली जाते. यंदा या उपक्रमासाठी १६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहावी आणि सातवीतील विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत या तीन कठीण टप्प्यांमधून यशस्वी होणे आवश्यक होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी, तसेच संशोधन वृत्ती विकसित होण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’, तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) या अवकाश संशोधन संस्थांची भेट घडविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यासाठी आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) सहकार्याने विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेतली गेली.
या सर्व चाचण्या उत्तीर्ण करत आदितीने आपली क्षमता सिद्ध केली. निगुडघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी आदिती दररोज सकाळी पायी ३.५ किमींचा प्रवास करते. सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर पुन्हा तासभर पायी चालून घरी येते. आदितीचे वडील पुण्याच्या मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. तर आई गावाला राहते. भोर तालुक्यात मावशीच्या घरी राहून आदिती शिक्षण घेत आहे. आदितीची स्थानिक माध्यमांनी बातमी दिल्यानंतर अदितीला शाळेत जाण्यासाठी एक सायकल आणि बॅग देण्यात आली आहे. तसेच तिच्या शाळेतील शिक्षिका वर्षा कुठवाड यांनी लॅपटॉपची मागणी केली आहे.
याविषयी आदिती पारठे म्हणते,’ मी खूप मेहनत घेतली. लेखी आणि ऑनलाइन परीक्षेनंतर मुलाखतीसाठी निवड झाल्यावर खूप आनंद झाला. आता नासामध्ये जाऊन अंतराळ संशोधन आणि शास्त्रज्ञांना भेटण्याची उत्सुकता आहे.
‘आमच्या घरातील कुणी विमानतळही पाहिलेलं नाही. पण आमची मुलगी आता सातासमुद्रापार नासाला जाणार आहे. हे स्वप्नवत आहे,’ असे तिच्या कुटुंबीयांनी भावुक होत सांगितले. ‘आदितीने शिक्षणाच्या जोरावर मोठं व्हावं, ही आमची इच्छा आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
कोंढरी गावातील ग्रामस्थांना आदितीच्या या यशाचा मनापासून आनंद आहे. ‘दुर्गम डोंगरी भागातून येऊन अशी संधी मिळवणारी आदिती आमच्यासाठी प्रेरणा आहे,’ असे गावकर्यांनी सांगितले.
‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे ही शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी महत्त्वाची बाब आहे,’ असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले.
आदितीच्या या यशाने भोर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नांना बळ मिळाले आहे. एका साध्या घरातील मुलीने मिळवलेले हे यश संघर्षातून यशस्वी होण्याचा आदर्श ठरले आहे. आदिती आता नासामध्ये अंतराळ संशोधनाच्या विश्वात पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. तिची ही गगनभरारी अनेकांना प्रेरणा देणारी ठरेल, यात शंका नाही.
नासा दौर्यात विद्यार्थ्यांबरोबर तीन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, आयुकाचे दोन कर्मचारी आणि एक वैद्यकीय अधिकारी प्रवास करणार आहेत. या योजनेसाठी जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन विकास समितीमधून एकूण २.२ कोटींचा निधी खर्च केला जणार आहे.