स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे यवतमाळहून
महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिबा अहमद हिने 142 वी रँक मिळवत महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशानंतर आई-वडिलांनी पेढा भरवत तिचे कौतुक व अभिनंदन केले.
आदिबाने पदवीचे शिक्षण आबेदा इनामदार महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. आदिबाने बीए उर्दु आणि बीए गणित विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर, तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली होती. आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होती. दरम्यान, आदिबाने यापूर्वी यूपीएससीची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड यादीत तिचे नाव आले नाही. मात्र, तिने हार न मानता पुन्हा युपीएससी परीक्षेची तयारी केली. यंदाच्या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. आदिबाने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.
आदिबाचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे. तर आई गृहिणी आहेत. आदिबाचे आईवडिल दोघेही जास्त शिकलेले नाही तरीही त्यांनी आपल्या मुलीला खूप चांगले शिक्षण दिले. तिच्या पाठीशी उभे राहिले. आपल्या लेकीला स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी पाठींबा दिला. आदिबाने देखील आईवडिलांचे नाव मोठे केले. आदिबाने आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. तिच्या मामाकडून तिला यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली असेही ती सांगते. आता ती आयएएस म्हणून कार्यरत होईल.