स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे उत्तर प्रदेशहून
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रामायणात उल्लेख असलेल्या पवित्र तमसा नदीला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले आहे. जिल्हाधिकारी आयएएस रवींद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत तब्बल ८९ किलोमीटर लांबीच्या नदीचे पुनरुज्जीवन केले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांत राबविलेल्या या मोहिमेने सरकारी उपक्रमाचे रूपांतर प्रभावी जनआंदोलनात केले.
एकेकाळी आझमगडच्या गावांसाठी जीवनवाहिनी असलेली तमसा नदी गेल्या काही वर्षांत अतिक्रमण, गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे अक्षरशः मृतप्राय झाली होती. अनेक ठिकाणी नदीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला होता. नदीपात्र तणांनी भरले होते, तर किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यामुळे नदीचे रूपांतर प्रदूषित नाल्यात झाले होते.
ही परिस्थिती पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र कुमार यांनी नदी पुनरुज्जीवनाचा निर्धार केला. मात्र, केवळ प्रशासकीय आदेशांवर अवलंबून न राहता त्यांनी १११ ग्रामपंचायतींच्या ग्रामप्रधानांशी आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. नदीचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगत लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३,४०० नागरिक, महिला बचत गट, विद्यार्थी आणि तरुण नदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. अनेकांनी श्रमदान करत नदीपात्र आणि नदीकाठ स्वच्छ केले. तब्बल १,५०० क्विंटल प्लास्टिक व अन्य कचरा नदीतून बाहेर काढण्यात आला.
नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम करण्यात आले. नदीकाठावरील अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे हटवून नदीला मोकळा श्वास देण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यातील आर्थिक लाभाचाही विचार करण्यात आला. नदीच्या दोन्ही काठांवर तब्बल ६५ हजार फळझाडांची लागवड करण्यात आली. आंबा, जांभूळ, पेरू यांसारख्या फळझाडांमुळे नदीकाठ हिरवागार होण्याबरोबरच भविष्यात स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे.
या प्रयत्नांचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत. नदीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला असून पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. नदीत मासे आणि जलचर पुन्हा दिसू लागले आहेत. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत झाली असून, नदीकाठावरील घाटांवर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही पुन्हा उत्साहात सुरू झाले आहेत.
तमसा नदीचे पुनरुज्जीवन केवळ पर्यावरणीय कामगिरी नसून स्थानिक वारसा आणि सामुदायिक अभिमानाचे पुनरुज्जीवन ठरले आहे. चंद्रेश्वर धाम, नर्मदेश्वर धाम आणि द्रोणाचार्य आश्रम यांसारख्या धार्मिक स्थळांच्या परिसरातही विकासकामे करण्यात आली. घाटांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि अभ्यागतांसाठी मार्ग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमाचे उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कौतुक केले आहे. नदी संवर्धनासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन केलेले हे काम देशातील इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
कधीकाळी कचरा आणि गाळाने गुदमरलेली तमसा आज पुन्हा प्रवाहित झाली आहे. प्रशासनाच्या इच्छाशक्तीला लोकसहभागाची जोड मिळाल्यास मृतप्राय जलस्रोतांनाही नवसंजीवनी देता येते, याचा आझमगडमधील तमसा नदीचा प्रयोग जिवंत पुरावा ठरला आहे.





