स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी बिहारमधून…
बिहारमधील मुंगेर जिल्ह्याचा मूळ रहिवासी असलेल्या शुभम कुमार पंजरिया याने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जगातील सर्व १९७ सार्वभौम देशांचा प्रवास पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘नोमॅड शुभम’ या नावाने सामाजिक माध्यमांवर लोकप्रिय असलेल्या शुभमने हा टप्पा गाठत सर्वात तरुण भारतीय आणि आशियाई प्रवासी म्हणून ओळख मिळवली आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रवास त्याने कोणत्याही कॉर्पोरेट प्रायोजकत्वाशिवाय किंवा पिढ्यानपिढ्या मिळालेल्या संपत्तीच्या आधाराशिवाय पूर्ण केला.
शुभमला वयाच्या १३–१४ व्या वर्षी प्रवासाची आवड निर्माण झाली. मात्र, २०१८ मध्ये केलेल्या लेह-लडाख प्रवासानंतर जगभर भटकंती करण्याचे त्याचे स्वप्न अधिक दृढ झाले. त्याआधी तो शाळेत जाण्यासाठीही अनेकदा वाहनांना लिफ्ट मागत असे. पुढे हाच अनुभव त्याच्या मोठ्या साहसी प्रवासाची तयारी ठरला.
वयाच्या १७ व्या वर्षी त्याने जगप्रवासाची सुरुवात केली. महागडी वाहने किंवा आलिशान प्रवास टाळत त्याने हिचहायकिंग (वाहनांना हात दाखवून मोफत प्रवास), स्थानिक बस आणि मालवाहू ट्रक यांच्या मदतीने अनेक देश पालथे घातले. या अनोख्या शैलीमुळे त्याला ‘हिचहायकिंगचा राजा’ म्हणूनही ओळख मिळाली.
प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात तो अनेकदा अवघ्या ५०० रुपयांच्या बजेटमध्ये दिवस काढत असे. पुढे त्याने १० ते १२ हजार रुपयांच्या मासिक खर्चात आपला प्रवास सुरू ठेवला. कालांतराने त्याच्या यूट्यूब वाहिनीला ३२ लाखांहून अधिक सदस्य लाभले आणि त्यातून त्याच्या प्रवासाला आर्थिक पाठबळ मिळाले.
त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास नेपाळमध्ये झाला. त्यानंतर त्याने रशिया, थायलंड, लाओस आणि इतर अनेक देशांचा प्रवास केला. रशियातील उणे ७१ अंश सेल्सिअस तापमान, सायबेरियासारखे अत्यंत दुर्गम प्रदेश आणि अफगाणिस्तानसारख्या संवेदनशील भागांतूनही त्याने प्रवास केला. अखेरीस ब्राझील हा १९७ वा देश गाठत त्याने ही ऐतिहासिक मोहीम पूर्ण केली.
या यशाविषयी शुभम पंजरिया म्हणाला, “जवळपास दहा वर्षांपूर्वी मी एका बॅकपॅकसह, अत्यल्प पैशात आणि एका मोठ्या स्वप्नासह हा प्रवास सुरू केला होता. मी लिफ्ट मागितली, ट्रक, बस आणि मिळेल त्या वाहनातून प्रवास केला. तासन्तास चाललो, आशा, शंका, उत्साह आणि भीती यांसोबत अनेक सीमा पार केल्या. आज १९७ वा देश पूर्ण झाला आहे आणि तो आहे ब्राझील. माझ्या आयुष्याला आकार देणारा हा प्रवास संपवण्यासाठी यापेक्षा सुंदर ठिकाण असू शकत नव्हते.”
शुभमची ही कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, आवड आणि स्वप्नांवर विश्वास असेल, तर परिस्थिती कोणतीही असो संपूर्ण जग फिरण्याचे स्वप्नही सत्यात उतरू शकते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.





