पारधी मुलांच्या जीवनात आणला शिक्षणाचा प्रकाश
शिपाई अनंत झेंडे यांच्या कार्याची यशस्वी गोष्ट
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे श्रीगोंदयाहून
महामानव बाबा आमटे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन समाजसेवेच्या विश्वात रममाण झालेले श्रीगोंदा येथील अनंत झेंडे हे १५० पारधी मुलांचा सांभाळ करीत आहेत. यात ६८ मुली आहे. त्यांनी या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे राहणे, जेवण ही सर्व जबाबदारी पार पाडली आहे. महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या पारधी मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणत मुलांना नवी दिशा व स्वप्ने देण्याचा प्रयत्न केला आहे.
अनंत झेंडे यांचे मुळगाव अहिल्यानगर- दौंड रस्त्यावरील चिखली येथील आहेत. सामाजिक कामाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाल्यामुळे लहानपणापासून समाजसेवेची आवड त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेत २००५ मध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून काम सुरू केले. त्यापूर्वी २००२ मध्ये भारतसेवक डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्याकडे त्यांनी श्रमसंस्काराचे धडे घेतले. आनंदवनमध्ये उन्हाळी शिबिरे केली. यामुळे समाजसेवा त्यांच्या नसानसात भिनली. त्यातूनच श्रीगोंदा तालुक्यातील पारधी, गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार त्यांच्या मनात आला. अनेक मुले दूर राहत असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहतात. असे लक्षात आल्यानंतर झेंडे यांनी श्रीगोंदा शहरातच मुलांची राहण्याची व्यवस्था केली. इतकंच नाही तर त्यांना तेथेच शिक्षणही घेता येईल याची व्यवस्था देखील केली. याच भावनेतून २००८ मध्ये शहरातील कुलकर्णी वाड्यात महामानव बाबा आमटे सेवाभावी संस्था या नावाने सहा मुलांना घेऊन त्यांनी वसतिगृह सुरू केले.
२०१३ मध्ये शेतकरी कुटुंबातील कन्या शुभांगी हिच्याबरोबर अनंत झेंडे यांचा विवाह झाला. पुढील कार्यासाठी त्यांना पत्नीचीही साथ मिळू लागली. संस्था स्थापन होऊन १७ वर्षाचा कालावधी लोटला. आता या वसतिगृहात ८२ मुले, ६८ मुली अशा १५० पारधी मुलांना आधाराची सावली मिळाली आहे. या कामात झेंडे यांच्या मागे आमटे परिवार, गिरीश कुलकर्णी, शिला संचेती, मृणाल राडकर, नरेंद्रभाई मिस्त्री, डॉ. प्रकाश बोरा, सतीश बोरा, डॉ. अरुण रोड, अनिल गावडे, उद्धव गायकवाड हे भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे संस्थेचा मांडवगण रस्त्यावर घुगलवडगाव शिवारात सहा एकर जागेवर जानकीबाई बजाज नावाने मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. आता येथील सावलीत पारधी मुले स्थिरावली आहेत.
याविषयी अनंत झेंडे म्हणतात, या पारधी समाजाला इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले होते. त्यामुळे यांची पिढी शिक्षणापासून दूर होती. आता या समाजाला रोजगार आणि शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यासाठी मुलांना मदत करणे महत्त्वाचे आहे. भविष्यात संस्थेतील मुलांना सकस आहार, दर्जेदार शिक्षण, स्वावलंबी जीवन जगण्याचा गुरूमंत्र देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.






