देशातील पहिली एआय अंगणवाडी नागपूरात
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नागपूरहून
सध्याच्या डिजिटल युगात लहानपणीच मुलांना तंत्रज्ञानचे धडे मिळावेत आणि त्यांच्या कल्पानाशक्तीला चालना मिळावी याबरोबरच ग्रामीण भागातील मुलांचाही सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्यावतीने ‘मिशन बाल भरारी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नुकताच त्याचा शुभारंभ वडधामना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित ही पहिली अंगणवाडी असून, यासाठी अंगणवाडीतील ताईंनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, प्रविण दटके, संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
नागपूर जिल्हा परिषदच्या या अंगणवाडीतील चिमुकल्यांना एआय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बडबडगीत, चित्रकला, नृत्य शिकवले जात आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या तार्किक व बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा, यासाठी एआय व्हीआर सेटच्या माध्यमातून आभासी घटनेची प्रत्येक्ष अनुभूती देणारे शिक्षण दिले जाते. या सिस्टम प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला दिलेल्या शिक्षण त्या विद्यार्थ्याने किती आत्मसात केले याची नोंद ठेवली जाते. निर्धारित वेळेत त्या विद्यार्थ्यात किती बदल आला हे देखील तपासले जाते. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानआधारित अभ्यासक्रमामुळे अंगणवाडीमध्ये शिकणारे चिमूकले विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने वर्गात बसतात.
आणखी ४० एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली आता ‘मिशन बाल भरारी’ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात आणखी ४० एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे पायलट सेंटर आर्टिफिशियल इंटेलिजेंस डॅशबोर्ड, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंट सारखी अत्याधुनिक डिजिटल साधने वापरते. ज्यामुळे लहान मुलांसाठी भविष्यकालीन आकर्षक अनुभव तयार होत आहे. तसेच, आगामी काळात जिल्हा परिषदे च्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही एआय तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे विनायक महामुनी यांनी सांगितले.
भारतामधील पहिली आगळीवेगळी पायलट योजना
नागरपूर जिल्हा परिषदेअंतर्गत राबवण्यात येणारा ‘मिशन बाल भरारी’ हा उपक्रम भारतामधील पहिला आगळावेगळा पायलट योजना आहे. यासाठी अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा, आनंद आणि कुतूहलाने त्याला शिकता यावे, हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील बालशिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.
खासगी बालवाड्यांपेक्षाही अंगणवाडी ठरतेय सरस
भारताची पहिली एआय-सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणार्या हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हिआर हेडसेट्स, एआय-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही सोय प्रीमियम खासगी बालवाड्यांमध्येही उपलब्ध नाही, असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे. त्यामुळे ही अंगणवाडी खासगी बालवाडीपेक्षाही सरस ठरत आहे.





