प्रिया कांबळे-जाधव
स्वदेस न्यूज :-
आजची बातमी आहे पुण्याहून…
भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानच्या विरोधात भारतीयांच्या मनात आता आगडोंब उसळला आहे. त्यामुळे आता देशभक्त भारतीयांनी तुर्कस्तानमध्ये नियोजित केलेल्या सहली रद्द केल्या आहेत. तसेच आपल्याकडून तिकडे माल निर्यात करणेही थांबवण्यास स्वयंस्फूर्तीने सुरुवात झालेली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला लष्करी विमाने भरून भरून ड्रोन, शस्त्रास्त्रे पाठविली होती. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात ‘बॉयकॉट तुर्की’ अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाते आहे. तर व्यापारांनी तुर्कीबरोबरचा व्यापार बंद करत तुर्कीवर ट्रेड स्टाईक केला आहे. तसेच तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकणाऱ्या भारतीयांची संख्या वाढते आहे.
पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद आणणे बंद केले आहे. यामुळे स्थानिक बाजारातून सफरचंद गायब झाले आहेत. ग्राहकांना अद्याप हे सफरचंद काश्मीरमधून येतातय की तुर्कीतून याची माहिती नव्हती, परंतू आता या निमित्ताने आता तुर्कस्तानमधून आपल्याकडे सफरचंद येतात आणि पुण्यात जवळपास १००० ते १२०० कोटींची उलाढाल होते, ती थांबविण्यात आली आहे.
पुण्याचे व्यापारी तुर्कीऐवजी आता इराण, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथून हा माल मागवत आहेत. तुर्कीकडून माल मागविणे थांबविल्याचे व्यापारी सय्योग झेंडे यांनी सांगितले आहे. तसेच अन्य एका व्यापाऱ्यानुसार तुर्कीच्या सफरचंदांची मागणी ५० टक्क्यांनी घटली असल्याचे सांगितले. ग्राहक आता उघडपणे या तुर्कस्तानमधून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घालत आहेत.
एवढेच नाही तर उदयपूरमध्ये देखील संगमरवरी (मार्बल) व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून संगमरवरी मागविणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत त्याच्याशी व्यापार केला जाणार नाही, असे दयापूर मार्बल प्रोसेसर्स कमिटीचे अध्यक्ष कपिल सुराणा यांनी सांगितले. भारतात आयात होणाऱ्या एकूण संगमरवरीपैकी सुमारे ७०% तुर्कीमधून येते, असे ते म्हणाले. देशभरातील सर्व संगमरवरी संघटनांनी तुर्कीसोबत व्यवसाय थांबवला तर जागतिक स्तरावर एक मजबूत संदेश जाईल, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
तुर्कीच्या पर्यटनावर भारतीयांनी टाकला बहिष्कार
ऑपरेशन सिंदूर दरम्यान अझरबैजान आणि तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात वाढत असून ट्रॅव्हल एजन्सी आणि प्लॅटफॉर्मने अशा सर्व ठिकाणांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. ट्रॅव्हल वेबसाइट इक्सिगोने दोन्ही देशांमधील सर्व फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग स्थगित केले, तर छोट्या ट्रॅव्हल वेबसाइट्सनी भारताच्या लष्करी कारवाईला पाठिंबा जाहीर केला.तुर्कीला जाणारे पर्यटकांचे बुकिंग रद्द करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सींमध्ये कॅप्चर अ ट्रिपचा समावेश आहे.
अलिकडच्या काळात अझरबैजानमधील बाकू आणि तुर्की ही शहरे पर्यटनासाठी लोकप्रिय झाली आहेत. परंतु भारताने पाकिस्तानवर केलेल्या लष्करी कारवाईत दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने, भारतीयांनी तेथे प्रवास करण्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे.
याविषयी इक्सिगोचे सीईओ अलोक बाजपेयी यांनी सांगितले की “सध्या सर्व भारतीयांच्या भावनांचा आदर करून, आम्ही तुर्की, अझरबैजान आणि चीनसाठी सर्व उड्डाणे आणि हॉटेल बुकिंग स्थगित केले आहेत. भारतीय प्रवाशांचा विश्वास, सुरक्षितता आणि हितांना प्राधान्य देताना जबाबदारीने आणि आपल्या देशाच्या व्यापक हितसंबंधांशी सुसंगत राहून काम करण्याची आमची वचनबद्धता आहे. रक्त आणि बुकिंग एकत्र वाहणार नाहीत,”
कॅप्चर ए ट्रिपचे ब्रँड मॅनेजर यशुल गुप्ता म्हणाले की आम्ही एक वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू केला होता आणि बाकू हे सातत्याने सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळ राहिले आहे. दरमहा सहा ते दहा ट्रिप वाढल्या होत्या,” परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ अनुभवण्यासाठी अधिकाधिक भारतीय बाकूला भेट देत असल्याने बाकूची लोकप्रियता वाढली. परंतु एक भारतीय कंपनी म्हणून, आम्ही आमच्या देशाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला.
ट्रॅव्होमिंटने तुर्की आणि अझरबैजानला जाणारे सर्व प्रवास पॅकेजेस स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तुर्की पाकिस्तानला शस्त्रे आणि ड्रोन पुरवत आहे आणि अझरबैजान देखील त्यांना पाठिंबा देत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या दोन दिवसांत परिस्थिती बिकट झाल्यामुळे ट्रॅव्हल एजंट्सनी अनेक रद्दीकरणांची नोंद केली. हवाई क्षेत्र आणि ३२ भारतीय विमानतळ बंद झाल्यामुळे, अमेरिका, जपान आणि युरोपमधील प्रवास योजना देखील रद्द करण्यात आल्या. परंतु अझरबैजान आणि तुर्कीसाठी बहुतेक रद्दीकरणे नोंदवली गेली.
“तुर्की आणि अझरबैजानसाठी मोठ्या प्रमाणात विमानसेवा रद्द करणे तीन दिवसांपूर्वी सुरू झाले. आणि जरी युद्धबंदीमुळे परिस्थिती बदलली तरी, पुढील सहा महिन्यांत भारतातून या दोन्ही देशांमध्ये जास्त प्रवास होणार नाही, जसे मालदीवमध्ये झाले होते ,” असे ट्रॅव्हल एजंट निमित मिधा म्हणाले, ज्यांची एजन्सी रोड्स अँड रोडवेजची दिल्ली आणि अहमदाबादमध्ये कार्यालये आहेत.
अनेक नियोजित दौरेही रद्द केले जात आहेत. पुण्यातील जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून ८०० जण तुर्कस्तानला फिरायला जाणार होते. परंतु या सर्वांनी देशहिताच्या भावनेतून ही सहल रद्द केली आहे.
तुर्की नागरिकांना गोव्यातील सुविधा बंद
भारताच्या कारवाईनंतर अमेरिका, रशियासारख्या बड्या देशांनी भारताला खुला पाठिंबा दिला. तर पाकड्यांचा मसिहा म्हणून तुर्की, चीनने छुपा पाठिंबा दिला. याच पार्श्वभूमीवर आता गोव्यात तुर्की (Turkey) नागरिकांना सेवा न देण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्झरी व्हेकेशन रेंटल्स, गोवा व्हिला आणि जागतिक स्तरावर कार्यरत असलेला भारतीय ट्रॅव्हल आणि अॅमोडेशन ब्रँड, गो होमपेज यांनी हा निर्णय घेतला.
यापूर्वी, गो होमस्टेजने तुर्की एअरलाइन्ससोबतची पाटर्नशिप तोडण्याची घोषणा केली होती. भारताबद्दलच्या तुर्कीच्या भूमिकेमुळे आम्ही तुर्की एअरलाइन्ससोबतची आमची पाटर्नशिप अधिकृतपणे संपवत आहोत. पुढे जाऊन आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पॅकेजमध्ये त्यांच्या फ्लाइट्सचा समावेश करणार नाही. जय हिंद, असे ट्विट करत कंपनीने हे स्पष्ट केले होते.
तुर्की नागरिकांना भारतीय सेवा वापरण्यास बंदी घालणारा कोणताही अधिकृत सरकारी निर्देश नसला तरी, काही भारतीय होमस्टे आणि प्रवास कंपन्यांनी निषेध म्हणून तुर्की नागरिकांवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यापक बहिष्काराच्या आवाहनांचा एक भाग म्हणून तुर्की प्रवासी कंपन्या आणि पर्यटनाशी संबंध तोडण्याचे आवाहन केले जात आहे.