- महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जपली विधायकता
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…
महामानवांचे विचार जागवून, त्यांचे आदर्श जीवन आत्मसात करून आणि आपल्यात परिवर्तन घडवूनच आपण त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकतो. पुण्यात दापोडीमधील युवकांनी एकत्र येऊन सलग १८ तास अभ्यास करून राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे. समाजासमोरही त्यांनी आदर्शांची जपणूक कशी करायची याचा वस्तुपाठ ठेवला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३४ वी जयंती आज मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. दापोडीतील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना त्यांना कृतिशील अभिवादन केले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय तसेच इतर काही ठिकाणी अशाच पद्धतीने अभ्यास आणि वाचन करून डाॅ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.
कुठलाही धांगडधिंगा न घालता आणि डीजे विरहित जयंती साजरी करावी असे आवाहनही युवकांनी यावेळी केले आहे. या विषयी सांगताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, दापोडीतील हा उपक्रम गेल्या १९ वर्षापासून आम्ही राबवत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोलंबिया येथे शिक्षण घेतले. सलग अठरा अठरा तास अभ्यास करून त्यांनी पदवी प्राप्त केली. तोच आदर्श युवकांमध्ये उतरावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो आणि युवकही उत्साहाने त्यात सहभागी होतात.