स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीतून
ओला आणि उबेर यांचे वर्चस्व लक्षात घेता त्यांना टक्कर देण्यासाठी आता लवकरच सरकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी तशी घोषणा केली आहे.
देशातील मोठ्या शहरांमध्ये ओला-उबर या खासगी टॅक्सी सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणारे व्यावसायिक या सेवेचा अधिकाधिक वापर करताना दिसतात. या कंपन्यांनी आता टॅक्सी सेवेचा व्यवसाय ऑटोरिक्षा आणि अगदी दुचाकीपर्यंतही वाढवला आहे. या कंपन्यांच्या विरोधात ग्राहकांकडून मोठ्या संख्येने तक्रारी येतात; परंतु आता पर्याय म्हणून लवकरच सरकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी घोषणा केली आहे की, केंद्र सरकारकडून ‘उबर’ व ‘ओला’सारखीच ‘सहकार’ टॅक्सी ही सहकारचालित राईड-हेलिंग सेवा सुरू केली जाईल. लोकसभेत चर्चेला संबोधित करताना अमित शहा यांनी हा उपक्रम पंतप्रधानांच्या ‘सहकार से समृद्धी’ (सहकार्यातून समृद्धी) या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे सांगितले.
अमित शाह म्हणाले, “हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार्यातून समृद्धी’ या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. तीन वर्षांपासून सहकार मंत्रालय ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत काम करीत आहे आणि येत्या काही महिन्यांत एक मोठी सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, ज्याचा थेट फायदा चालकांना होईल.”
‘सहकार टॅक्सी’ सेवेचा चालकांना कसा फायदा होईल?
अमित शाह यांनी सांगितले की ‘सहकार टॅक्सी’ ही सहकारी तत्त्वावर आधारित राइड-हेलिंग सेवा चालकांना थेट फायदा व्हावा यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ओला व उबर यांसारख्या अॅपवर आधारित सेवांनुसार तयार करण्यात आलेला हा उपक्रम सहकारी संस्थांना दुचाकी, टॅक्सी, रिक्षा व चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यास अनुमती देईल. त्यामुळे मध्यस्थांना चालकांच्या कमाईतून कपात करता येणार नाही आणि त्याचा चालकांना थेट फायदा होईल. जून २०२२ मध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत एक सर्वोच्च सहकारी संस्था असलेल्या राष्ट्रीय पर्यटन आणि वाहतूक सहकारी महासंघाकडूनसुद्धा अशाच प्रकारची कॅब-हेलिंग सेवा जाहीर करण्यात आली होती.